विद्यार्थी गुणगौरव
रत्नागिरी : रत्नागिरी तालुका भंडारी संघातर्फे दिनांक २६ सप्टेंबरला भंडारी समाजाच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दहावीमध्ये ८५ व बारावीमध्ये ८० टक्के गुण संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनाही गौरविले जाणार आहे.
अनेक गावे स्पर्धेत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक मसाल्याचे गाव करण्याचा निर्णय जिल्हा परिषद कृषी विभागाने घेतला आहे. यामुळे अनेक गावे स्पर्धेत उतरण्यासाठी तयार झाली आहेत. लवंग, दालचिनी, काळीमिरी, जायफळ, हळद, नारळ, पोफळी अशी विविध मसाल्यांमध्ये समाविष्ट होणारी अनेक गावांमध्ये लागवड झाल्यास पर्यटनाला चालना मिळणार आहे.
पदवीदान समारंभ
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या देव-घैसास - किर - कला - वाणिज्य - विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात दिनांक ६ सप्टेंबरला पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रवेशासाठी मुदतवाढ
रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पत्रकारिता, मानवी हक्क अभ्यासक्रमासाठीही मुदतवाढ प्राप्त झाली असून, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.