मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रूक शिंदेवाडीतील विठोबा गणपत माने यांचे रहाते घर अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.शिंदेवाडीतील विठोबा माने, पत्नी रुक्मिणी व त्यांची बहीण सुहासिनी पवार हे तिघेजण एकत्रित राहतात. हे सर्वजण मोलमजुरी करुन पोट भरतात. सकाळी सातच्या सुमारास हे सर्वजण नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून गावात मोलमजुरी करण्यासाठी गेले होते.मात्र सकाळी ८.३० वा.च्या सुमारास विठोबा माने यांच्या घरातून धूर येत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. लागलीच सर्व ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली. परंतु घराला कुलूप असल्यामुळे ग्रामस्थांना काहीच करता येत नव्हते. काही ग्रामस्थांनी विठोबा माने यांना घराला आग लागल्याचे कळवले. यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचे कुलूप उघडले.यानंतर सर्व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले अर्थातच आगीच्या ज्वालांनी पूर्ण घराला वेढा घातला व संपूर्ण घर आगीमध्ये जळून खाक झाले. या आगीत टीव्ही, मिक्सर, घरगुती भांडी, कपडे, धान्य, गोदरेज कपाट, तीन फॅन, मुलांच्या लग्नातील आहेराची भांडी, विद्युत वायरींग, देव्हारा, कौले, लाकडी सामान, बँकेची पासबुके, विविध कागदपत्रे, ६ हजार रुपयांची रोख रक्कम आदी जळून भस्मसात झाले. अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक राहिले नसल्याने विठोबा माने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उपासमारीची वेळ लागली आहे. याचाच त्यांना धक्का बसला आहे.आग लागल्याचे समजताच मंडळ अधिकारी हनुमंत आठल्ये व गावचे तलाठी एम. एम. सरदेशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यामध्ये १ लाख १६ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. तशाप्रकारचा अहवाल त्यांनी देवरुख तहसील कार्यालयाकडे सादर केला आहे.गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी, निवासी नायब तहसीलदार विक्रम पाटील, महावितरणचे अधिकारी रमेश कदम, गावचे पोलीस पाटील शांताराम इप्ते आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)
निवेबुद्रूक येथे घर जळून भस्मसात
By admin | Updated: August 17, 2014 00:39 IST