परभणी : अनेक वर्षांपासून झालेली शहरातील रस्त्यांची दैना मनपाच्या प्रयत्नांमुळे फिटली. शहरात १६५ रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.शहरातील सर्वच रस्त्यांची वाताहत झाली होती. मागील पाच-सहा वर्षांपासून ही स्थिती होती. त्यातच परभणी नगरपालिका महानगरपालिकेत रुपांतरित झाली. त्यामुळे रस्त्यांचा विकास होईल, अशी आशा निर्माण झाली. परंतु रस्त्यांची कामे होण्यासाठी नागरिकांना तब्बल अडीच वर्षे वाट पहावी लागली. सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. उखडलेले रस्ते आणि त्यात साचलेले पाणी यातून वाहनधारकांना मार्ग काढावा लागत. रस्ते खराब असल्याने शहर भकास दिसत होते. शहराला आलेली बकाल अवस्था घालविण्यासाठी रस्ते आणि नाल्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावी लागणार होती. परंतु त्यास मुहूर्त सापडत नव्हता. खराब झालेल्या रस्त्यांमुळे संपूर्ण शहर धुळीने माखले होते. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यांनी वाहनधारकांना मणक्याचे आजार तर धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावत होते. या सर्व परिस्थितीचा रोष मनपावर वेळोवेळी व्यक्त होत होता. अखेर महानगरपालिकेने रस्त्यांच्या कामाला सुरूवात केली. त्यात ९ कोटी रुपये खर्चाचे हॉटमिक्सचे काम, १ कोटी रुपयांचे नाली बांधकाम आणि ५० लाख रुपयांचे उद्यान विकासाचे काम हाती घेण्यात आले. नगरोत्थान योजनेमध्ये १ कोटी ५० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. असे एकूण १२ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.नगरोत्थान योजनेमधून जिंतूर रस्ता - गणपती मंदिर चौक - विद्यानगर चौक हे ७५ लाख रुपयांचे काम पूर्ण झाले. त्याचप्रमाणे देशमुख हॉटेल - जायकवाडी परिसर हे ७५ लाखांंचे काम पूर्ण झाले. दर्गा रोड, शिवाजी चौक ते वैष्णवी मंगल कार्यालय, मरीआई मंदिर - धाररोड, मरीआई मंदिर - वांगी रस्ता, जायकवाडी रेस्ट हाऊस - हडको, उघडा महादेव - एम.आय.डी.सी., देशमुख हॉटेल - संत गाडगेबाबा नगर, फुले चौक ते नारायणचाळ, जागृती कॉलनी, शिवाजी चौक - भजनगल्ली, आजम चौक ते खदान, एकमीनार - अबरान खान, खाजाभाई - पारवा रोड, जुना पेडगाव रस्ता - मंजिरा हॉटेल, प्रभावतीनगर - खाजा कॉलनी, सरकारी दवाखाना व्हाया ललित कला भवन, शाही मशिद - अपना कॉर्नर ही कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील १६५ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, अनेक कामे आता पूर्णत्वाकडे आहेत. दरम्यान, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, स्थायी समिती सभापती विजय जामकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, गटनेते अतुल सरोदे, दिलीप ठाकूर, उपायुक्त दीपक पुजारी, शहर अभियंता रमेश वाघमारे, कनिष्ठ अभियंता विलास संगेवार, रोड कारकून डी. बी. देवकर, अ. हमीद, मो. बद्रोद्दीन, नंदकुमार महामुनी आदींनी कामाची पाहणी केली.(प्रतिनिधी)यांच्यामार्फत सुरू आहेत कामे...शिवशक्ती कन्स्ट्रक्शन (अशोक जेठवाणी, मो.भाई जान), प्रिया कन्स्ट्रक्शन (मुरली खुपसे, बंडू खिल्लारे), पल्लवी कन्स्ट्रक्शन (सुधीर पाटील), गोयल कन्स्ट्रक्शन (श्याम अग्रवाल).नागरिकांमध्ये समाधानअनेक वर्षानंतर शहरात रस्त्याची कामे होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रस्त्याबरोबरच पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. विशेष म्हणजे शहराला पुरेल असा मूबलक पाणीसाठा मनपाकडे उपलब्ध आहे. परंतु, तरीही नियोजनाच्या अभावामुळे आठ-आठ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे. मनपाने पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
परभणीतील रस्त्यांचे उजळले भाग्य
By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST