रत्नागिरी : कोरोनामुळे प्राथमिक शाळा गतवर्षी (मार्च २०२०)पासून बंद आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने मुलांना ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. नेटवर्कमुळे ५५ टक्के ऑनलाईन अध्यापन सुरू असले तरी ४५ टक्के मुलांचे अध्यापन स्वाध्यायपुस्तिका व अन्य मार्गांनी सुरू आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ‘एक नवीन ब्रीज कोर्स’ तयार केला आहे. अध्यापनातील दरी भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्सचे अध्यापन शिक्षकांना करावे लागणार आहे.
शासकीय व खासगी शाळेतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून (एससीईआरटी) ब्रीज कोर्सचा अभ्यासक्रम तयार केला आहे. शैक्षणिक, मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून ब्रीज कोर्सचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
कोरोनामुळे मार्च (२०२०)पासून शाळा बंद असून, दीड महिन्यांपासून विद्यार्थी शाळेला दुरावले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला ब्रीज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे. ब्रीज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार केले आहेत. ऑनलाईन माध्यमातून अध्यापन सुरू झाले असले तरी ब्रीज कोर्स शिकावाच लागणार आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी तिसरीत असेल, तर ब्रीज कोर्स दुसरीच्या पाठ्यक्रमावर असणार आहे. शाळा बंद असून, ऑनलाईन शिक्षणामध्ये मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत, परंतु पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही, असे महत्त्वाचे विषय ब्रीज कोर्समध्ये आहेत. प्रत्येक विषयाचा ब्रीज कोर्स स्वतंत्र असणार आहे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे. पंचेचाळीस दिवसांचा ब्रीज कोर्स असणार आहे.
------------------------------
पुढील वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा ब्रीज कोर्स मदत करणार आहे. सुरूवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर चाचपण्याची सूचना केली आहे. ब्रीज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही, हेही शिक्षकांना पाहावे लागणार आहे. ब्रीज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रीज कोर्स शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रीज कोर्स असणार आहे.
----------------------
ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. शाळा सुरू झाल्यावर थेट अभ्यासक्रम शिकविण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्स मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या आठवडाभरातच ब्रीज कोर्सचे अध्यापन सुरू होणार आहे.
-----------------------------
अध्यापनातील पोकळी भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्स नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होताच ब्रीज कोर्सचे अध्यापन करावे लागणार, हे अभिप्रेत होते. मात्र, उशीर झाला आहे. परंतु, ब्रीज कोर्समुळे मुलांच्या ज्ञानकोषाला नक्कीच उजाळा प्राप्त होणार आहे.
- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.