पूरग्रस्तांना मदत
खेड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील कार्यरत चालक, वाहकांनी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्त भागाची स्वच्छता केली. शिवाय जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय भांडारे, उमेश खेडेकर, जयप्रकाश बेंडखळे, आप्पा रजपूत, संजय साळवी, राजेश मोरे, नितीन पवल, शैलेंद्र भंडारे, आदी उपस्थित होते.
गटारांचा अभाव
दापोली : तालुक्यातील हर्णै रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारे सुस्थितीत नसल्याने मुसळधार पडणारे पावसाचे पाणी बाजारपेठेसह रस्त्यावर येत असल्याने भूमिगत गटारे बांधण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. हर्णै गाव मच्छिमारीचे बंदर असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची गर्दी असते. गटारे तुंबल्याने पाण्यातून मार्ग काढत पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत आहे.
लसीकरणाची मागणी
खेड : तालुक्यातील जनावरांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे घटसर्प, फऱ्या, आत्रविषाद असे आजार कमी होण्यास मदत होते. मात्र यावर्षी हे लसीकरण मंदगतीने सुरू असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे.
व्यापारी संघटनेकडून मदत
राजापूर : येथील पूरग्रस्तांसाठी पाचल व्यापारी संघटनेतर्फे किराणा साहित्याची १५० किट्स मदत देण्यात आली. किटमध्ये तांदूळ, तेल, साखर, चहापावडर, तिखट, तूरडाळ, चणाडाळ, काळा वाटाणा, मीठ, बिस्कीट पुड्यांचा समावेश होता. सहकार्याबद्दल व्यापारी संघटनेचे विनायक सक्रे, कादर बावानी यांचे काैतुक करण्यात येत आहे.