चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनातर्फे शहरातील रामतीर्थ तलावाचे पर्यटन विकास निधीतून सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे. हा तलाव ना नफा ना तोटा या तत्त्वावर बोटिंग व अन्य सुविधांसाठी चालवण्यास देण्यात यावा, अशी मागणी चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज संस्थेने केली आहे. याबाबत २७ रोजी होणाऱ्या विशेष सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. परिसरातील पिंपळ व वटवृक्ष हे आजही येथे सावली देत आहेत. या तलावाच्या प्रवेशद्वारासमोर पेशवेकालीन शिलालेख, पाषाण इतिहासाची साक्ष देत उभा आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरिया हिने रामतीर्थ तलावाचे काम केल्यासंदर्भात १८८९ असा लिहिलेला पाषाण शिलालेख आजही रामतीर्थच्या पुरातन घाटावर उभा आहे. या तलाव परिसरात विखुरलेले पुरातन अवशेष इतिहासाची साक्ष देत तग धरुन आहेत. त्यामुळे या तलावाला चिपळूण शहराच्यादृष्टीने ऐतिहासिक महत्व आहे. रामतीर्थ तलावानजीकच्या विकसित केलेल्या पर्यटन सुविधा प्रायोगिकतत्त्वावर ना नफा ना तोटा तत्त्वावर ग्लोबल या संस्थेला वापरण्यास दिल्यास या तलावात नागरिकांना चांगल्या प्रकारची बोटिंग सुविधाही उपलब्ध करुन येथील तरुणांना काही प्रमाणात रोजगार मिळेल. तसेच चिपळुणात पर्यटनही वाढीस लागेल, असा विश्वास शहर परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. रामतीर्थ तलावनजीक विकसित केलेले स्टॉल्स, टॉयलेट टॉवर, सिलिंग रुम व परिसर ३ वर्षांकरिता प्रायोगिकतत्त्वावर संस्थेला वापरण्यास मिळावा, अशी मागणी अध्यक्ष राम रेडीज, नगरसेवक मिलिंद कापडी, संजीव अणेराव, शाहनवाज शहा, समीर कोवळे, समीर जानवलकर, राजू पाथरे आदींनी नगर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. २७ मे रोजी चिपळूण पालिकेची सभा होणार असून त्या सभेत या विषयावर चर्चा केल जाणार आहे.शहरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तलावातील गाळ उपसण्याबाबत मोहीम राबविल्यास या ठिकाणी खऱ्या अर्थाने पर्यटनस्थळ आकारात येऊ शकते. यासंदर्भात होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार असल्याने सत्ताधारी व विरोधक कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर या तलावात बोटींग सुविधा झाली तर रामतीर्थ तलाव पर्यटकांनी गजबजून जाणार आहे. (वार्ताहर)
रामतीर्थ तलावात होणार बोटिंग सुविधा
By admin | Updated: May 26, 2015 00:58 IST