लांजा :
शासनाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून लांजा नगरपंचायत हद्दीतील पारंपरिक असलेल्या वाड्यांची नावे बदलण्यासाठी सत्ताधारी शिवसेना अग्रेसर दिसत आहे. वाड्या- वस्त्यांची असलेल्या नावांची अस्मिता पुसण्याचे काम केले जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवक गटनेते संजय यादव यांनी केला आहे.
संजय यादव यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले की, लांजा, कुवे, नगरपंचायत कार्यक्षेत्रात गुरववाडी, सनगरवाडी, नाभिक वाडी, बौद्धवाडी, भटवाडी, तेलीवाडी, रोहिदावाडी, लिंगायतवाडी, कुक्कुटपालन कुंभारवाडी, मुजावरवाडी, कुंभारवाडी, धुंदरे - सुतारवाडी, कुवे - गुरववाडी, कुवे - बौद्धवाडी, सोनारवाडी अशा १५ वाड्यांच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या या नावाने गावातील अस्मिता जोडलेली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या निमित्ताने लांजा नगरपंचायतीमधील सत्ताधारी शिवसेना ही नावे बदलून लांजा कुवेवासीयांची भावना दुखावण्याचे काम करत आहे. शासनाच्या निर्णयाच्या चुकीचे अर्थ लावून ही नावे बदलली जात आहेत. खरंतर बदलल्या जाणाऱ्या नावांचा व शासन निर्णय यांचा काही संबंध नाही; परंतु चुकीचा अर्थ लावून ही नावे बदलण्यासाठी शिवसेना अग्रेसर असल्याचे संजय यादव यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे मुळात लांजाच्या बाहेरून येऊन विस्थापित झाल्याने खरंतर या दोघांनाही लांजाचा इतिहास माहीत नाही. गाववाल्यांना विचारात न घेता व कोणताही विचार न करता अतिशय घाईगडबडीने सभेसमोर विषय ठेवण्यात आला; परंतु पुढील सभेमध्ये विषय घेण्यात यावा, असे भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे असतानाही व लांजा कुवेवासीयांना विचारात न घेता सत्ताधारी शिवसेनेने प्रक्रियेला सुरुवात करणे ही लांजावासीयांची कायमस्वरूपी अस्मिता पुसण्याचा प्रयत्न असल्याचे संजय यादव यांनी सांगितले. शासन निर्णय कोणताही असेल तरी नगरपंचायत हद्दीतील वाड्यांची असलेली अस्मिता पुसली जाऊ नये हे आमचे ठाम म्हणणे आहे. याविरुद्ध भाजप ग्रामस्थांशी चर्चा करून आपले निवेदन सादर करणार आहे. वेळ पडल्यास लांजा कुवेवासीयांतर्फे आंदोलन उभे करू, असा इशारा नगरसेवक संजय यादव यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, हेमंत शेट्ये, विजय कुरूप, मयूर शेडे, नगरसेवक शीतल सावंत, मंगेश लांजेकर, अशोक गुरव, इक्बाल गिरकर, अरुण कांबळे, आवळे गावकर उपस्थित होते.