आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकलमध्ये १७ सप्टेंबर १९९४ ला प्लांट नं. १ मध्ये अशाच स्वरूपाचा मोठा अपघात झाला होता. तब्बल २७ वर्षांनंतर तसाच स्फोट घरडा केमिकल्समध्ये घडला. त्याच्या आठवणी आता जाग्या झाल्या आहेत.
साधारणपणे १९८८ म्हणजेच अंदाजे ३३ वर्षांपूर्वी घरडा केमिकल लि. या कंपनीची लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील आवाशी ग्रामपंचायत हद्दीत स्थापना झाली. सुरुवातीपासूनच घरडा कंपनी म्हणजे सर्वांत घातक रसायनांचे उत्पादन घेणारी कंपनी म्हणून ओळख झाली. काही अंशी परिसरातील खेड व चिपळूण तालुक्यातील तरुणांना नोकरीत सामावून घेतले गेले. हळूहळू घरडा कंपनी आपले पाय या ठिकाणी रोवत असताना सुरुवातीला एक प्लांट उभा केला. १९८९ मध्ये याच एक नंबरच्या प्लांटमध्ये स्फोट होऊन टेकमबुरम देवस्कुट्टी अॅन्ड्रोज या परप्रांतीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे आधीच घरडा कंपनीला घाबरणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांच्या मनात या स्फोटामुळे आणखीनच घबराट निर्माण झाली. मात्र, कंपनीने त्यावर मात करीत आपल्या प्रगतीचा आलेख पुढे चढता ठेवला. त्यानंतर आणखी काही प्लांट उभारत असतानाच पुन्हा एकदा याच एक नंबर प्लांटमध्ये १७ सप्टेंबर १९९४ रोजी मोठा स्फोट घडला. शनिवारी झालेला स्फोट त्या स्फोटाची आठवण करून देणारा आहे. याच स्फोटात चिपळूण तालुक्यातील कुटरे गावचा रहिवासी राजेशिर्के, महाड, जि. रायगड येथील पेडणेकर, तर आंध्र प्रदेशमधील पकालाराव या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातून कंपनी सावरत असताना त्यांच्या प्रगतीचा आलेख चढताच होता. मात्र, पुन्हा एकदा दहा वर्षांपूर्वी सन २००९ - १० दरम्यान प्लांट नं. ४ मध्ये स्फोट होऊन शिंदे नामक अभियंता मृत्युमुखी पडला. कंपनीत वर्षाकाठी एकतरी अपघात घडत असतो. मग तो उत्पादन प्रक्रियेशी संबंधित असो वा ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या बांधकाम, इंजिनिअरिंग या कामासंदर्भात असो.
तीन वर्षांपूर्वी पुणे येथील ‘पीएससी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ या बांधकाम क्षेत्रातील कंपनीचा कामगार इमारतीचे काम सुरू असणाऱ्या इमारतीवरून उंचावरून पडून मृत्यू झाला होता. यावेळी त्याने सेफ्टी बेल्टचा वापर न केल्याने त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर आदळला होता. येथीलच इंजिनिअरिंग क्षेत्रात कायमस्वरूपी काम करणाऱ्या ‘चौधरी इंजिनिअरिंग’ या कंपनीचा एक कामगार रिअॅक्टर चढवीत असताना त्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. गतवर्षी घरडा कंपनीच्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती करणाऱ्या कोजन (Cojan) या वीज प्रकल्पाच्या कोळसा साठवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडवरून पडून पुणे येथील ‘अखाडे इन्फ्रास्टक्चर कंपनी’ यांचा कामगार मयत झाला होता.
साधारणपणे दरवर्षी कंपनीत एखाद्दुसरा अपघात होतच असून, त्यात कदाचित कुणाचा तरी बळी जातो, तर एखाद्याला कायमचे जायबंदी व्हावे लागते.
ज्या दिवशी म्हणजेच दिनांक २० रोजी स्फोट झाला त्याच्या आदल्याच दिवशी कंपनीचा वार्षिकपूर्ती कार्यक्रम होता. त्यानुसार त्यांनी गुरुवार, दिनांक १८ रोजी कंपनीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम कंपनी दरवर्षी करीत असते व दिनांक १९ मार्च हा कंपनीचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. मागील वर्षीच्या कोविड संसर्गजन्य महामारीमुळे कंपनीने मागील वर्षी व यंदा स्थापना दिवस साजरा केलेला नाही. मात्र, स्थापना दिवसाच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी आर अॅण्ड डी विभागातील प्लांट नं. ७ मध्ये स्फोट होऊन चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. एक जण अजूनही मरणयातना भोगत आहे. त्यामुळे घरडा कंपनीत बळी जाणाऱ्या कामगारांची परंपरा कायम असून, कदाचित भविष्यात कंपनीशेजारी राहणाऱ्या रहिवाशांचा बळी जाऊ नये, यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्याचे रहिवाशांतून बोलले जात आहे.