चिपळूण : नोकरी गेल्याने घरातच असलेल्या मुलाला कुठेतरी कामावर जा. अन्यथा शेतात कामाला चल, असे सांगितल्याचा राग मनात धरून मुलाने वडिलांना जबर मारहाण करण्याचा प्रकार चिपळूण तालुक्यातील गुढे जाधववाडी येथे २८ मे रोजी रात्री ९ वाजता घडला. याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात कल्पेश लक्ष्मण जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश लक्ष्मण जाधव (गुढे- जाधववाडी, चिपळूण) हा पुणे येथे नोकरी करत होता. लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने तो गावी आला होता. बरेच दिवस घरातच असल्याने वडील लक्ष्मण गणपत जाधव यांनी त्याला कुठेतरी नोकरी बघ कामावर जा. अन्यथा शेतावर कामाला चल, असे सांगितल्याने त्याचा राग कल्पेश याला आला आणि त्याने शिवीगाळ करत काठीने वडील लक्ष्मण यांना जोरदार मारहाण केली.
याबाबत लक्ष्मण गणपत जाधव यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार कल्पेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.