भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणशोत्सवास प्रारंभ होतो. भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत उत्सव साजरा करण्यात येत असला तरी भाविक आपल्या इच्छेनुसार, पद्धतीनुसार दीड दिवस, तीन, पाच, सात, दहा दिवस गणेशोत्सव साजरा करतात. काही ठिकाणी तर २१ दिवस गणपती ठेवण्याचीही प्रथा आहे. बालगणेशापासून मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. गणपतीपुळेत गणेशमूर्ती घरी न आणता मंदिरातील गणपतीची पूजा केली जाते. ‘स्वयंभू गणपती’ हाच आमचा गणपती अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा असल्याने गणपतीची मूर्ती घरी न आणणाऱ्यांचे गाव म्हणून गणपतीपुळ्याची वेगळी ओळख आहे. मात्र, गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनामुळे येथील स्थानिकांना गणपतीचे स्पर्श दर्शन घेता आलेले नाही. यावर्षी प्रत्येक गावातून २५ लाेकांची नावे निश्चित करून त्यांना मंदिरात प्रवेश देण्याचे ठरविले हाेते. पण त्याला काहींनी नापसंती दर्शविल्याने माेजक्याच लाेकांनी स्पर्श दर्शन घेतले.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर सावट आहे. शासनाच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. शासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले असून, मिरवणुकांना बंदी आहे. गणेशभक्तांनी सवाद्य मिरवणुकांना फाटा देत मुखाने ‘मोरया’चा गजर करीत गणेशमूर्ती आणल्या आहेत. जिल्ह्यात १०८ सार्वजनिक व एक लाख ६६ हजार ५३९ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भक्तिभावाने पूजा करताना कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी बाप्पाला साकडे घालण्यात येत आहे.
वाडीवस्तीवर वसलेल्या गावातील ४०-५० कुटुंबांकडून गणेशमूर्ती एकत्रित डोक्यावरून नेण्याची प्रथा आजही जपली जात आहे. काही ठिकाणी पारंपरिक वेशात लेझीम खेळत, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, गणेशमूर्तींची मिरवणूक काढली जाते. हातगाडी, रिक्षा टेम्पो, ट्रकमधून गणेशमूर्ती आणल्या जातात. काही भाविक गणेशमूर्ती अन्य गावातून आणण्यात येतात. काही वाड्यांमध्ये जायला पायवाटा शेताच्या बांधावरून जातात. त्यामुळे डोक्यावर गणेशमूर्ती घेऊन कसरत करीत जबाबदारीने गणेशमूर्ती घरी आणली जाते.
गणेशचतुर्थी दिवशी काही ठिकाणी भटजींकडून प्राणप्रतिष्ठापना केली जाते तर, काही ठिकाणी भाविक स्वत:च पूजा करतात. उत्सव काळात दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा, करून नैवेद्य अर्पण केला जातो. सायंकाळी आरती मात्र चांगलीच रंगते. दररोज आरतीची मजा मात्र वेगळीच असते. नातेवाईक-शेजारी- मित्रमंडळी एकत्रित जमून प्रत्येक घरी वेळा ठरवून ताला-सुरांत विविध चालींमध्ये आरती सादर केली जाते. दोन-दोन तास टाळ, झांजा, ढोलक-मृदंगाच्या साथीने गणेशाच्या भक्तीत भाविक तल्लीन होतात. वर्षभर कधी-कुणाकडे जाणं होत नसलं तरीही आरतीला, बाप्पाच्या दर्शनाला एकमेकांकडे जाण्याची पद्धत कोकणात अद्याप असल्याने नाते संबंध दृढ होण्यास मदत होते.
गणेशोत्सवाला धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे विविध पैलू आहेत. गणेशोत्सवात मंत्रपुष्पांजली, सहस्त्रावरणे, अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर रात्री भजन, जाखडी आदी सांस्कृतिक कार्यक्रमही रंगतात. भजनाची डबलबारी, जाखडी नृत्यातील स्पर्धा कोकणवासीयांच्या आवडीचा भाग आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे यावर निर्बंध आले आहेत.
चार ते पाच दिवसांचा उत्सव साजरा करून पाचव्या दिवशी गौरीसह बहुतांश गणपतीचे विसर्जन केले जाते. काही भाविकांकडे मात्र वामनव्दादशी किंवा अनंत चतुर्थीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. उत्सव काळात वर्षभर परगावी असलेले कुटुंब एकत्र येते. प्रत्येक काम एकत्रित येऊन किंवा एकमेकांच्या मार्गदर्शनाने केले जाते. अनेक भाविक श्रावणापासून संपूर्ण शाकाहार अवलंबतात तो गणेश विसर्जनानंतरच मांसाहार करतात. कोरोनामुळे बाहेरगावी असलेली मंडळी गावी परतली असल्याने भाविकांमधून एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.
सव्वाशे वर्षांची परंपरा
खेड तालुक्यातील आंबये गावात भाद्रपद चतुर्थीच्या एक दिवस आधीच गणेशमूर्ती आणल्या जातात. गेली अनेक वर्षांपासून परंपरा सांभाळण्यात येत आहे. बुरूमवाडीत विराजमान होणारे गणेशमूर्ती डावळवाडीतील कृष्णा जुवळे यांच्या घरांमध्ये चतुर्थीच्या आदल्या दिवशी आणून बसवले जातात. तृतीयेला जुवळे पती-पत्नी संपूर्ण घर शेणाने सारवून घरामध्ये रांगोळीचा छानसा सडा घालतात. घराच्या प्रवेशद्वारास बाप्पा विराजमान होणाऱ्या सर्व खोलीत दिव्यांची आरास केली जाते. दुसरे दिवशी पहाटे सर्वच विराजमान बाप्पांना धूपदीपाने ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
खड्ड्यांतून प्रवास
लाॅकडाऊनमुळे रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. त्यातच पावसामुळे रस्ते निकृष्ट झाले आहेत. वारंवार खड्डे बुजविण्यात आले तरी वाहनांच्या वर्दळीमुळे खड्डे पुन्हा उखडले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागासह महामार्गावरील रस्त्यांची भयानक अवस्था निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण मोठे असल्याने पावसाचे पाणी साचून जलाशय निर्माण झाला आहे. निकृष्ट रस्त्यावरून प्रवास करताना, नागरिक तर हैराण होत आहेत, शिवाय बाप्पांनाही खड्ड्यांतून प्रवास करावा लागला. वाहनातून गणेशमूर्ती नेत असताना वाहनचालकांना फार काळजी घ्यावी लागली.
- मेहरून नाकाडे