अडरे : चिपळूण शहरातील गोवळकोट खाडीमध्ये रत्नागिरी महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री ९.३० वाजता छापा टाकून ८ डंपरसह ६०० ब्रास वाळू जप्त केली. यावेळी एकूण ९ वाळू व्यावसायिकांवर कारवाई करून ४० लाख २९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. काही होड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. गोवळकोट खाडीमध्ये बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार रत्नागिरीचे प्रभारी तहसीलदार हेमंत साळवी, खनिकर्म विभागाचे अव्वल कारकून बी. ए. बेर्डे, रत्नागिरीचे मंडल अधिकारी के. ए. चव्हाण, मालगुंडचे मंडल अधिकारी एस. ए. पाटील, कोतवडेचे मंडल अधिकारी एस. एस. कांबळे यांच्यासह रत्नागिरीतील ५ तलाठी यांच्या पथकासह चिपळूण महसूल विभागाचे तहसीलदार वृषाली पाटील, नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मंडल अधिकारी समीर देसाई, तलाठी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. यामध्ये शहरातील गोवळकोट येथील ७ व्यावसायिकांवर व कालुस्ते येथील २ अशा ९ वाळू व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये सचिन जाधव ६५ ब्रास, मुजब्बीन बेग ९७ ब्रास, अनिकेत निवळकर ९१ ब्रास, समीर पटेल ८० ब्रास, मोहसीन भोसविलकर ६८ ब्रास, मन्सूर पटेल ७२ ब्रास, अजिज खतीब ६० ब्रास, एजाज परकार ४० ब्रास, आरीफ परकार ३५ ब्रास आदींसह डंपरचालक दिनेश सुर्वे १ ब्रास, विकास पवार २ ब्रास, महादेव राठोड दीड ब्रास, शंकर साळवी २ ब्रास, मलिम पुजारी २ ब्रास, उमेश सकपाळ २ ब्रास, दिनेश घाग २ ब्रास, सूर्यकांत कदम २ ब्रास आदींवर कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने केलेल्या कारवाईच्या अवैध व्यवसायाला आळा बसेल. रविवारीही प्रशासनाने वाळू व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. सलग दोन दिवस केलेल्या या कारवाईने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)प्रशासनाने रविवारीही वाळू व्यावसायिकांवर कारवाई केली. अवैध उपसा करणाऱ्या ४३ बोटी सील करण्यात आल्या आहेत. चिपळूण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या भरारी पथकाने कारवाई केली. या भरारी पथकामध्ये ४ मंडल अधिकारी आणि १६ तलाठ्यांचा समावेश होता. चिपळूण गोवळकोट येथे करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ४३ बोटी सील करण्यात आल्या. यावरून गोवळकोट येथील खाडीत होणाऱ्या अवैध वाळू उपशाची कल्पना येऊ शकते.रविवारी मोठी कारवाईचिपळुणात ८ डंपरसह ६०० ब्रास वाळू जप्त.९ वाळू व्यावसायिकांवर ४० लाख २९ हजार रुपयांचा दंड.गोवळकोट येथील सात, तर कालुस्ते येथील २ व्यावसायिकांचा समावेश.रविवारीही प्रशासनाची मोठी कारवाई.कारवाईने व्यावसायिकांचे धाबे दणाणले.रत्नागिरीचे प्रभारी तहसीलदार हेमंत साळवी यांचाही कारवाईत सहभाग.
वाळू व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा
By admin | Updated: August 10, 2015 00:14 IST