खेड : तालुक्यातील नांदगाव धावलाचा चढ या ठिकाणी रविवारी (दि. २३) सायंकाळी गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या प्रौढावर झालेला जीवघेणा हल्ला हा पत्ते खेळण्यातील आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ याप्रकरणी २३ रोजी मध्यरात्री पोलिसांनी शहरात राहणाऱ्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या हल्ल्यात दिलावर हसन बुखारी (५६, रा़ साठेमाेहल्ला) हे जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे खेडमध्ये मटका, जुगाराचे अड्डे अजूनही सुरू असल्याचे पुढे आले आहे.
तालुक्यातील नांदगाव याठिकाणी दि. २३ रोजी दुपारी २.४५ ते ५.१५ या कालावधीत रक्ताच्या थारोळ्यात प्रौढ आढळल्याने खळबळ उडाली होती. परंतु, सलाम याकूब जुईकर (५०, रा. साठेमोहल्ला) यांनी खेड पोलीस ठाण्यात रात्री उशीरा दिलेल्या तक्रारीनंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. जुईकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोष्टी आळीतील वरवाटकर संकुलमध्ये राहणाऱ्या अवधूत राजेश घोडे (२१) याने जुईकर याचे मेहुणे दिलावर हसन बुखारी यांच्यावर आर्थिक कारणावरून प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात बुखारी यांच्या डोक्यावर, हातावर गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. जुईकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलिसांनी अवधूत घोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मंगळवारी (२४ रोजी) सकाळी त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत.