खेड : वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक असलेले ट्रान्सफार्मर आणि विजेचे खांब देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी दापोली येथील महावितरणचे सहायक अभियंता विजय जगन्नाथ डोइफोडे यांना खेड येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयाने ४ वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.२३ मार्च २०११ रोजी विजय डोईफोडे यांनी दापोली काळकाईकोंड येथे राहणारे शासकीय ठेकेदार अब्दुल्ला महंमद शरीफ काझी यांच्याकडे विजेच्या जोडणीच्या कामासाठी ३० हजार रूपयांची लाच मागितली होती. हे पैसे डोईफोडे यांनी आपल्या निवासस्थानी देण्यास सांगितले होते.त्याप्रमाणे शरीफ यांनी रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक डी. बी. बांदेकर यांनी सापळा रचला आणि डोईफोडे यांना ३० हजार रूपये लाच घेताना रंगेहात पकडले. याबाबत दापोली पोलीस स्थानकात डोईफोडे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७, १३ (१), (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची सुनावणी खेड येथील न्यायालयात झाली. सोमवारी न्यायालयाने डोईफोडे यांना अखेर ४ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी सरकारी वकील मेघना नलावडे यांनी ४ साक्षीदार तपासले होते़ (प्रतिनिधी)
सहाय्यक अभियंत्याला सश्रम कारावासासह दंड
By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST