रत्नागिरी : जमिनीच्या वादातून महिलेला तसेच तिच्या पुतणी आणि वहिनीला धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील पावस बाजारपेठेतील खारवीवाडा येथे घडली. या प्रकरणी ८ जणांविरोधात पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून, ही घटना बुधवार, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१८ वाजण्याचा सुमारास घडली.
या प्रकरणी वैशाली प्रवीण पावसकर (४०, रा. पावस बाजारपेठ, खारवीवाडा, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार ऊर्मिला पावसकर, अल्का पावसकर, शर्मिला पावसकर, चंद्रभागा पावसकर आणि अन्य ४ जण (सर्व रा. पावस बाजारपेठ, खारवीवाडा, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वैशाली पावसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही वर्षांपासून त्यांचा जमिनीवरून वाद सुरू आहे. यातूनच बुधवारी सायंकाळी संशयितांनी वैशाली पावसकर यांना त्यांच्या घराजवळून शिवीगाळ केली. तसेच वैशाली पावसकर यांच्या घरात घुसून काठ्या व लाेखंडी शिगांनी मारहाण केली. या वेळी त्यांची पुतणी आणि वहिनीलाही धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल संदेश चव्हाण करत आहेत.