रत्नागिरी : गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.
पौष महिना सुरू झाला असून, पौष महिन्यात फळधारणा कमी होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचे सातत्य कायम राहून मोहोर प्रक्रिया सुरू झाली तर फळधारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवी नसलेल्या झाडांचे प्रमाण १५ ते २० टक्के होते. परंतु अवेळच्या पावसामुळे या झाडांनाही पालवी आली. मात्र, काही ठिकाणी मोहोर आला असला तरी हे प्रमाण अवघे १० टक्केच होते. या मोहोरावर सध्या थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. थ्रीप्सपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असून, उत्पादनापेक्षा खर्चच अधिक आहे.ऑक्टोबरमध्ये आलेली पालवी जून होत असून, थंडीमुळे पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. शिवाय कोवळ्या पालवीलादेखील अंकुर येण्याची शक्यता आहे. पालवीवर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुडतुड्यावर कीटकनाशक फवारणी करून नियंत्रणात आणला आहे. मात्र किडीमुळे शेतकरी हैराण असून, कृषी विभागदेखील या किडीबाबत साशंक आहे. शेतकरी बांधव कृषिसेवकांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करीत आहेत.पालवीवर किडींचा प्रादुर्भावअत्यल्प मोहोर असणाऱ्या झाडांना सध्या साबुदाणा, वाटाणा आकारातील फळधारणा झाली आहे. थंडी वाढली तर फळधारणा झालेल्या झाडांना पुनर्मोहोराचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे पीक सध्यातरी निसर्गावर अवलंबून आहे. विविध संकटातून वाचलेले पीक २० मार्चनंतर बाजारात येण्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाणही अत्यल्प असणार आहे.उत्पादन वाचविण्यासाठी खर्च अधिकगतवर्षी जानेवारीत ३० ते ४० टक्के मोहोर होता. यावर्षी जेमतेम १० टक्के आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बाजारात आला होता. यावर्षी मात्र आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता असून, गुढीपाडव्याचा मुहूर्त यावर्षी शेतकऱ्यांना साधणे अशक्य आहे. हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.