रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सत्ताधारी सहकार पॅनेलसमोर शिवसंकल्प पॅनेलच्या माध्यमातून २० उमेदवार उभे करून शिवसेनेने आव्हान उभे केले आहे. ‘राष्ट्रवादी’चे नेते रमेश कदम यांनी ‘शिवसेने’चे धनुष्य हाती घेत बॅँकेच्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा बाण सत्ताधाऱ्यांवर मारला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग आला आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा अजूनही सुरू असली, तरी दोन्ही बाजंूच्या उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असल्याने आता निवडणूक अटळ मानली जात आहे.मुदतवाढीमुळे जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतरही तीन वर्षे अधिक सत्ता लाभली. त्याचा पुरेपूर उपयोग बॅँकेची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी डॉ. तानाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने केला. आठ वर्षांपूर्वी डबघाईला आलेली बॅँक फायद्यात आणली आहे. कर्मचाऱ्यांची रखडलेली वेतनवाढ झाली. भागधारकांना लाभांश मिळाला. बॅँकेला आर्थिक शिस्त लावली. एनपीए शून्य टक्क्यावर आणला. त्यामुळे चोरगे यांच्या कडक शिस्तीचा गवगवा झाला. विरोधकांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. आता तेच विरोधक निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या विरोधात आखाड्यात उतरले आहेत. बॅँकेच्या २१ संचालकपदांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल झाल्यानंतर सहकार पॅनेलने राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजप अशा तीन पक्षांना प्रतिनिधित्व देत सहकार पॅनेलचे उमेदवार घोषित केले. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी शिवसेना स्वबळावर निवडणुकीत उतरली. माजी आमदार सुभाष बने व माजी आमदार गणपत कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातब्बर नेते नारायण राणे यांना ज्या पद्धतीने दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेनेने मात दिली, त्याच धर्तीवर रमेश कदम यांना मोहरा बनवून सत्ताधारी सहकार पॅनेलच्या विरोधात टक्कर देण्याचा प्रयत्न शिवसेनेने जिल्ह्यात केला आहे. मात्र, राष्ट्रवादी, कॉँग्रेस यांचा जिल्ह्यात सहकारातील पाया मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या गाड्या दणकेबाज नसल्या, तरी सहकाराचा पाया असलेल्या मार्गावरून धावत आहेत, असे सध्याचे चित्र आहे. निवडणुकीशीसंबंधित राजकीय नेतेच सध्यातरी प्रचारात उतरले आहेत. नारायण राणे यांच्या राजकीय आखाड्यात वावरण्याचा अनुभव बने, कदम या दोघांनाही आहे. त्यामुळेच त्यांनी प्रचाराचा दणका उडविला आहे. त्यासंदर्भात अनेक राजकीय डावपेच आखले गेले आहेत. त्याचा शिवसेनेला फायदा होईल की नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहणार, की सेनेचा त्यात मोठा शिरकाव होणार, हे ५ मे नंतर स्पष्ट होणार आहे. जिल्हा बॅँक निवडणुकीत भाजप अन्य पक्षांबरोबर सहकार पॅनेलमध्ये सहभागी आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर या पॅनेलचे भक्कम वर्चस्व आहे. त्यामुळे रत्नागिरी व दापोली वगळता कोणतीही जागा विरोधकांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना हे सहकार पॅनेलला आव्हान ठरूच शकत नाही. - सचिन वहाळकर, जिल्हाध्यक्ष, भाजपविरोधकांचे कोणतेही आव्हान नाही : चोरगेजिल्हा बॅँक निवडणुकीत आमच्यापुढे विरोधकांचे कोणतेही आव्हान नाही. सहकार क्षेत्रात काम केलेल्यांनाच आम्ही सहकार पॅनेलमधून प्रतिनिधित्व दिले आहे. मतदारांशी गाठीभेटी सुरू आहेत. बॅँकेला सहकार क्षेत्रातील अनुभवींची गरज आहे. जिल्हा बॅँक ही शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ही बॅँक यापुढेही सहकार पॅनेलच्या हाती देण्याचे काम मतदार नक्की करतील, असा विश्वास जिल्हा बॅँकेचे चेअरमन डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केला.बिनविरोधाची शक्यता नाहीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचे वृत्त चर्चेत आले होते. मात्र, दोन्ही पॅनेलकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीला सुरुवातही केली आहे. आता कोणीही माघार घेणार नाहीत.
सेनेच्या ‘धनुष्या’ला कदमांचा ‘बाण’
By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST