रत्नागिरी : मुंबईतील गेट वे ऑफ येथील ‘नीलकमल’ बोटीला अपघात झाल्यानंतर दापोली तालुक्यातील दाभोळ येथील आरीफ बामणे तातडीने मदत कार्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. साडेतीन वर्षाच्या मुलीसह अन्य नागरिकांना वाचविण्यासाठी मदत केली. यावेळी २० ते २५ जणांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समुद्रात बुडणाऱ्या नागरिकांसाठी जणू ते ‘लाईफ जॅकेट’च बनून आले हाेते.आरीफ बामणे हे मुंबईत पायलट बोटीवर कामाला आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथे नीलकमल बाेटीला अपघात झाला, त्यावेळीही ते आपली सेवा बजावत होते. ते काम करत असलेल्या बोटीवर अपघाताची सूचना मिळाली आणि ते बाेट घेऊन त्या दिशेने निघाले. तिथे पोहोचल्यानंतर बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.सगळीकडून ‘आम्हाला वाचवा..वाचवा..’ अशा किंकाळ्या ऐकू येत होत्या. सगळेच मदत मागत होते. त्यामुळे काय करावे काहीच सुचत नव्हते. ज्यांच्याकडे लाइफ जाकीट नव्हते त्यांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला. बामणे यांनी जवळपास २० ते २५ जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मदत कार्य करताना एक साडेतीन वर्षाची मुलगी त्यांनी पाहिले. तिला हातात घेताच तिचा श्वास बंद असल्याचे लक्षात आले. बुडणाऱ्यांना वाचविण्याबाबत थाेडी माहिती असल्याने त्याचा उपयाेग करुन त्या मुलीच्या पाेटातील पाणी बाहेर काढले. काही वेळातच तिचा श्वास सुरु झाला आणि समाधान वाटले, असे बामणे यांनी सांगितले.
१० ते २० मिनिटांची ही धक्कादायक घटना आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली. या आधी कधी इतका मोठा अपघात पाहिला नव्हता. आमच्या आधी पेट्रोलिंग बोट व दुसरी बोट होती; पण आम्ही गेल्यानंतर अधिक लोकांना वाचविण्यात यश आले. बुडणाऱ्यांची तेथील परिस्थिती पाहून खूप वाईट वाटत होते. जेवढे शक्य झाले तेवढ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. - आरीफ बामणे.