अपघाताचा धोका
दापोली : आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या वाकडा आंबा परिसरातील रस्त्यावरील मोरीचा भाग खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत आहे. साईडपट्टी कमकुवत झाल्याने समोरुन वाहन आल्यास विशेषत: दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.
आंबोळकर यांची निवड
राजापूर : तालुक्याच्या मुख्यालयी कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या आनंद आंबोळकर यांची रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राजापूर महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, कोतवाल संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कार्यालय उद्घाटन
राजापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कोदवली येथील जननी महिला प्रभाग संघाच्या कोदवलीतील नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, सरपंच रमेश गोडावे उपस्थित होते.
खड्ड्यांचे साम्राज्य
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली - कुचांबे रस्त्यावर कुंभारखणी बुद्रुक हायस्कूलसमोर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. १६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, मात्र हायस्कूलसमोरील १०० मीटर लांबीचा रस्ता त्यामधून वगळण्यात आला आहे.