रत्नागिरी : गेल्या तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर सफाई कामगार म्हणून झालेली १२ कामगारांची नियुक्ती बेकायदेशीर असून, ती तातडीने रद्द करावी, त्यांना नोकरीतून कमी करावे व आतापर्यंत दिलेल्या पगाराची वसुली करावी, असे आदेश नगरपरिषद आयुक्त मुंबई (महाराष्टÑ) यांनी काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबाबतचे पत्र जिल्हाधिकार्यांकडून रत्नागिरी पालिकेला १५ दिवसांपूर्वीच प्राप्त झाले. त्यानुसार नोटिसा बजावल्याने त्या १२ कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, नगरपरिषद आयुक्तांच्या या निर्णयाला कोल्हापूर औद्योगिक न्यायालयाने तूर्त स्थगिती दिली आहे. सेवेत असताना एखादा कर्मचारी मृत झाला वा अन्य कारणाने त्याला सेवेतून मुदतीआधी बाहेर जावे लागले तर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या वारसाची नियुक्ती केली जाते. मात्र, रत्नागिरी पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करताना नियम धाब्यावर बसविल्याचे नगरपरिषद आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, आपल्या नोकर्यांवर आलेले गंडांतर टाळण्यासाठी या १२ सफाई कामगारांनी नोकरीतून काढण्याच्या या आदेशाला कोल्हापूरच्या औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. त्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने तूर्तास शासनाच्या आदेशाला २५ मे २०१४ रोजी स्थगिती दिली आहे. या स्थगितीबाबतचे पत्र कामगारांनी पालिका प्रशासनाच्या सुपूर्द केल्याने या १२ कर्मचार्यांवरील कारवाई तूर्त टळली आहे. (प्रतिनिधी)
बारा सफाई कामगारांची नियुक्ती तूर्त कायम
By admin | Updated: May 30, 2014 00:59 IST