लांजा : तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये शनिवारी घट झाली असतानाच रविवारी पुन्हा २४ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण १९७७ रुग्ण आढळले असून, १५८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुक्यात झपाट्याने वाढणारी काेराेनाची संख्या शनिवारी कमी झाली हाेती. शनिवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे ४ रुग्ण आढळले हाेते. मात्र, रविवारी पुन्हा एका दिवसामध्ये २४ रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. या रुग्णांमध्ये अँटिजन कोरोना चाचणीत ९ जण तर आरटीपीसीआर चाचणीत १५ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये पुनस कडुवाडी २, प्रभानवल्ली १०, भांबेड १, वेरळ १, खावडी १, लांजा साईधाम अपार्टमेंट १, पन्हळे शेट्येवाडी १, केळंबे माळवाडी १, लांजा धावणेवाडी १, लांजा गोंडेसखल रोड ४ आणि वाकेड मावळतवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाचे ३०३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तर ८६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.