चिपळूण : तालुक्यातील कळवंडे गावी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याच्यावर बिनबोभाट अंत्यसंस्कार पार पडले, परंतु एका अज्ञात व्यक्तीने पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना पाठविलेल्या पत्रामुळे या खुनाला वाचा फुटली आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंद कोकरे यांनी या सातही आरोपींना मंगळवारी अटक केली. शुक्रवारी (दि. २८ नोव्हेंबर) मृत सुनील बाळाराम जावळे (वय ३०, रा. जावळेवाडी, कामथे) व त्याचा सख्खा भाऊ मिलिंद बाळाराम जावळे, संदेश विष्णू शिगवण व प्रकाश तुकाराम शिगवण (सर्व रा. कामथे जावळेवाडी), गंगाराम सीताराम नाचरे, विजय पांडुरंग नाचरे, मंगेश तुकाराम नाचरे, विशाल ऊर्फ नानू विठ्ठल कदम (सर्व रा. कळवंडे नाचरेवाडी) असे आठजण कळवंडे जंगलात शिकारीला गेले होते. दरम्यान, प्राण्याला मारताना बंदुकीतून गोळी झाडली गेली आणि ती गोळी लागून सुनील जावळे ठार झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कामथे जावळेवाडी येथे आणून वाड्यात ठेवण्यात आला. सख्खा भाऊ मिलिंद बरोबर असल्याने सुनीलच्या पत्नीला मृतदेह दाखविण्यात आला नाही. लगेच वाडीत बैठक घेऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला व शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता सुनीलवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदूक लपवून रक्ताने माखलेल्या कपड्यांसह सर्वच पुरावे नष्ट करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.शिकार करताना चुकून गोळी लागून सुनीलचा मृत्यू झाला असता तर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून शिकारीचा गुन्हा दाखल झाला असता. त्यामुळे ही माहिती पुढे आणू दिली गेली नाही. गुरुवारी (दि. ३) पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना कामथे गावातून एक निनावी पत्र आले. या निनावी पत्राची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. कोणताही पुरावा हाती नव्हता. शिवाय ग्रामस्थ खरी माहिती देणे शक्य नव्हते. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे ही मोहीम सोपविण्यात आली. कोकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अतिशय गुप्त रीतीने हा तपास पूर्ण केला आणि एकाचवेळी सोमवारी रात्री सर्व सातही आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी दिवसभर या आरोपींचा तपास सुरू होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोकरे यांनी खबर दिल्यानुसार सातही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच भारतीय हत्यार कायदा लागू करण्यात आला आहे. निनावी पत्रामुळे या मृत्यूला वाचा फुटली. याप्रकरणी कोकरेंबरोबर पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव, हवालदार सुनील पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश नाले, गगनेश पटेकर, संदीप नाईक, योगेश नार्वेकर, सचिन जाधव, आदी सहकारी होते. आज, बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)धावताना बार उडालादि. २८ नोव्हेंबरच्या रात्री कुत्र्यांसह आरोपी शिकारीला गेले होते. मध्यरात्रीनंतर परत येताना रात्री दीड वाजता समोरून गाडी आली म्हणून घाबरून आम्ही लपण्याचा प्रयत्न केला. सुनील पळत असताना पडून त्याच्या बंदुकीतून बार उडाला व त्याच्या मानेला गोळी लागली. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे सर्व आरोपींचे व मृताच्या पत्नीचे म्हणणे आहे.या प्रकरणात सर्व पुरावे नष्ट करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वस्तुस्थिती माहीत असतानाही ग्रामस्थांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामस्थांवरही पोलीस कारवाई करणार आहेत. कारण दबावाला बळी पडून नातेवाईकही सत्य परिस्थिती सांगत नाहीत. त्यामुळे हा गुंता अधिक वाढला आहे. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
निनावी पत्राने गूढ उकलले, सात अटकेत
By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST