मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोना काळात खंड पडलेल्या चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त, सावखेड- औरंगाबाद येथील डॉ. प्रभाकर मांडे आणि दुर्गभ्रमक-गिर्यारोहक बाळकृष्ण ऊर्फ आप्पा परब यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.कोरोनामुळे दोन वर्षांतील खंडित पुरस्कारांसह यावर्षी तीन जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा केली आहे. सन २०२०चा सांस्कृतिक क्षेत्रासाठी असलेला जीवन गौरव पुरस्कार ९० वर्षीय दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त यांना घोषित करण्यात आला आहे. सन २०२१ चा शैक्षणिक क्षेत्रासाठी असलेला चतुरंग जीवनगौरव पुरस्कार सावखेड- औरंगाबाद येथील डॉ. प्रभाकर मांडे यांना घोषित केला आहे. तर सन २०२२ च्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी असलेल्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ८३ वर्षीय दुर्गभ्रमक-गिर्यारोहक बाळकृष्ण ऊर्फ आप्पा परब यांची निवड करण्यात आली आहे.सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या तिन्ही पुरस्कारांच्या निवडीसाठी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली वासुदेव कामत, अरुण नलावडे, विनायक परब, सुधीर जोगळेकर, डॉ. अजय वैद्य, डॉ. अरविंद जामखेडकर, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. नितीन करमळकर आणि डॉ. कविता रेगे व मंजिरी मराठे यांच्या निवड समितीने काम पाहिले. हे तीनही पुरस्कार येत्या डिसेंबर महिन्यात, तीन वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या तीन रंगसंमेलनात समारंभपूर्वक प्रदान केले जातील, असे चतुरंग प्रतिष्ठानने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दिग्दर्शक राजदत्त, डॉ. मांडे, दुर्गभ्रमक-गिर्यारोहक परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचे ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
By मनोज मुळ्ये | Updated: August 30, 2022 19:12 IST