रत्नागिरी : राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
हा अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यातील सर्व महाविद्यालयात पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्याबाबत सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याद्वारे ऑनलाईन अर्जाची पडताळणी होऊन अर्ज निश्चित केला जाईल.
ज्या विद्यार्थ्याकडे संगणक किंवा मोबाईल फोन नाही ते जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन नोंदणी करून प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करतील. पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० जून ते २३ जुलै दरम्यान www.dtemaharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे, सोबतच अर्जाच्या छाननीची पद्धत निवडून आवश्यक कागदपत्रांच्या कॉपी वेबसाईटवर अपलोड करायच्या आहेत, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औदुंबर जाधव यांनी कळविले आहे.