रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे तौक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी ती मदत पुरेशी नसल्याचे याआधीही सिद्ध झाले आहे. भरपाई देताना मुळातच तुटलेल्या झाडांसाठी दिली जाणारी रक्कम तुटपुंजी आहेच, शिवाय जे फळ झाडावरून पडले त्याचा भरपाई देताना कोणताच विचार झालेला नाही. बागायतीच्या नुकसानाचो पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे ते पंचनामे झाल्यावर तरी सरकार या नुकसानाचा प्राधान्याने विचार करेल, असे अपेक्षित आहे.
तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगला तडाखा दिला. केवळ किनारपट्टीवरील गावेच नाही तर मध्यवर्ती असलेल्या आणि अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवार दुपारपासून सुरू झालेल्या वादळाचा प्रभाव सोमवारी रात्रीपर्यंत जाणवत होता. वादळी वाऱ्यांसोबतच मुसळधार पाऊसही पडत असल्याने अनेक गावांना नुकसानाची झळ बसली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरीचाही आढावा घेतला. या वादळाची पूर्वकल्पना असल्याने आणि निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव गाठीशी असल्याने यावेळी प्रशासनाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याने नुकसानाची तीव्रता कमी झाली आहे. खेड तालुक्यात विद्युतभारीत तार तुटल्याने दांपत्याचा मृत्यू झाला. याखेरीज जिल्ह्यात कोठेही जीवित हानी झाली नाही.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दौरा केल्यामुळे मोठ्या मदतीची अपेक्षा केली जात होती. राष्ट्रीय आपत्तीच्या निकषानुसार मदतीचे प्रमाण कमी आहेे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाप्रसंगी या निकषात बदल करण्यात आला. त्यानुसार घरांसाठी पाच हजार रुपयांऐवजी पंधरा हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे लोकांचा फायदा झाला, पण नुकसानाचे प्रमाण खूप मोठे होते. त्यामुळे ही मदत पुरेशी नव्हती. तसा आक्षेप सातत्याने लोकांनी घेतला. मात्र त्यात बदल झाला नाही. आता तौक्ते चक्रीवादळाप्रसंगीही तशीच मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्यात बदल होण्याची मोठी गरज आहे.
...........................
झाडाला ५०० रुपये
वादळामध्ये जी झाडे पडली अशा झाडांना प्रत्येकी ५०० रुपये भरपाई दिली जाणार आहे. मात्र ही रक्कम खूपच कमी आहे. तुटलेल्या झाडाचे लहान तुकडे करून ते बागेतून हटवण्यासाठीच यापेक्षा जास्त खर्च येतो. त्यामुळे ही रक्कम खूपच कमी ठरते. त्यावर लोकांचा खूप मोठा आक्षेप आहे. मात्र त्यात सरकारने कोणताही बदल केलेला नाही.
...............
उत्पन्न मोठे, भरपाई छोटी
आंबा, पोफळी, माड, काजू ही सर्वात मोठे उत्पन्न देणारी झाडे आहे. ही झाडे जेवढी जुनी तेवढे त्याचे उत्पन्न अधिक असते. आंब्याचे एक झाड अगदी दहा हजार रुपयांपासून जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचे उत्पन्न देऊ शकते. अशा झाडांना फक्त ५०० रुपये भरपाई हा बागायतदारांवर मोठा अन्यायच आहे.
................
बागांचे पुनरुज्जीवन दुर्लक्षित
निसर्ग चक्रीवादळ असेल अथवा तौक्ते चक्रीवादळ असेल यात बागांचे नुकसान खूप मोठे झाले आहे. अनेक झाडे दोन, तीन पिढ्यांपासून उत्पन्न देणारी होती. ज्या झाडांनी पिढ्या घडवल्या आणि पुढचा काही काळ जी झाडे आधार देणार होती, अशा झाडांना फक्त ५०० रुपये भरपाई हा मोठा तोटा हाेणार आहे.
....................
पंचनाम्यांबाबत गांभीर्य हवे
नुकसानाचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे पंचनामे दरवेळी वादग्रस्त होतात. ज्यांचे नुकसान मोठे आहे, अशांना भरपाई कमी मिळते आणि ज्यांचे नुकसान कमी आहे, अशा लोकांना अधिक भरपाई मिळते, असे आक्षेप घेतले जतात. त्यामुळे पंचनामे योग्य होतील, यावर लक्ष देणे गरजेचे आहे.