गुहागर : कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या लाल मातीत हळदीचे पिक उत्तम प्रकारे येते हे येथील तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना व्यावसायिक व तांत्रिकदृष्ट्या अधिक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून गुहागर पंचायत समितीच्यावतीने सेस अनुदानांतर्गत ‘व्यावसायिक हळद लागवड कोकणातील शेतकऱ्यांना एक सुवर्णसंधी’ या विषयावरील प्रशिक्षण वर्ग सोमवार (आज) ३० मार्चला पंचायत समिती सभागृहामध्ये सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आले आहे.कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात हळद लागवड शेतकरी आपल्या परसदारात करतात. विविध गुणकारी व औषधी गुणधर्म असलेली हळद जेवणापासून लग्न कार्यापर्यंत वापरली जाते. जिल्ह्यातील हळद व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आर्थिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते. या हेतूने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे सभापती राजेश बेंडल व उपसभापती सुरेश सावंत यांनी सांगितले.या प्रशिक्षण वर्गामध्ये गेली दहा वर्षे हळद लागवडीमध्ये वेगवेगळे प्रयोग करुन उत्पादन क्षमता वाढविणारे प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर हे अनुभवावर आधारीत व्यावसायिक हळद लागवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. गुहागर तालुक्यातील हळद लागवड करणाऱ्या उपस्थित शेतकऱ्यांची मनोगते व गुहागर तालुका पंचायत समितीतर्फे नावीन्यपूर्ण योजनातून कशा प्रकारे सहकार्य केले जाणार असल्याबाबतची माहिती सभापती राजेश बेंडल, उपसभापती सुरेश सावंत व कृ षी अधिकारी देणार आहेत.या प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी बी. ई. साठे व सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय आंबी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पर्यायी उत्पन्नाचा विचार होणे आवश्यक
By admin | Updated: March 30, 2015 00:18 IST