लाॅकडाऊनमुळे मंडणगड शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला हाेता. (छाया : प्रशांत सुर्वे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : शासनाने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला मंडणगड तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता अन्य जीवनावश्यक वस्तू व सेवांची तालुक्यातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्ते शांत झाले हाेते.
शनिवारी होणारा लॉकडाऊन हा पूर्वनियोजित असल्याने तालुक्यातील जनतेने याकरिता पूर्वतयारी केली हाेती. रविवारीही अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने एस. टी. महामंडळानेही अंतर्गत वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद ठेवल्या होत्या. तालुक्याबाहेर जाणाऱ्या एस. टी. तुरळक प्रमाणात रस्त्यावर धावत हाेत्या. शनिवारी पहाटे तालुक्यातील मुख्य नाक्यावर पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. भिंगळोली, पालवणी फाटा, पोलीस चेक नाका येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, तालुक्यातील कुंबळे, देव्हारे, म्हाप्रळ, वेसवी येथील बाजारपेठांमध्येही कडकडीत बंद ठेवण्यात आला हाेता.