खेड : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने तालुक्यातील सर्व शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्याची प्रक्रिया मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे. परंतु, तालुक्यातील खासगी कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालय मात्र सुरू राहणार आहे. एका बाजूला तिसऱ्या लाटेबाबत सातत्याने दक्षता घेण्याची सूचना सरकार देत असून, दुसऱ्या बाजूला कोविड सेंटर बंद करत आहे, हा विरोधाभास असल्याची चर्चा होत आहे.
तालुक्यात सध्या एकूण ७१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कमी झालेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाने मंगळवार, दि. ३१ पासून सर्व शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तालुक्यात शिवतेज आरोग्य सेवा संस्था व चिंचघर येथील एस. एम. इंग्लिश स्कूलच्या इमारतीमधील भैरवनाथ कोविड केअर सेंटरमधील ज्या रुग्णांची प्रकृती सुधारत आहे, अशांना गृह अलगीकरणात तर ज्यांना अद्याप वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे त्यांना कळंबणी रुग्णालय व खेड येथील नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत तालुक्यात ७१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. यामध्ये भैरवनाथ कोविड सेंटरमध्ये १७ तर शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित कोविड सेंटरमध्ये १५ असे एकूण ३२ रुग्ण उपचार घेत होते. याशिवाय १४ जण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळासाठी विनावेतन रजेवर जाण्यासाठी सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात अचानक रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची सर्वच पातळीवर धावपळ उडाली होती. ऐनवेळी कोविड सेंटर उभारण्यासाठी जागा ते आवश्यक असलेला कर्मचाऱ्यांचा ताफा सर्वच बाबतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. राजकीय पक्षांनी शासनाला इमारती व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले मात्र परिचारिका, वार्डबॉय, सफाई कामगार व डॉक्टर मिळवताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते.
पहिल्या लाटेत शासकीय कोविड सेंटरमध्ये इतरत्र खासगी ठिकाणी काम करणाऱ्या अनेक परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी काम केले होते. मात्र, ही लाट ओसरताच जानेवारी महिन्यात शासनाने कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश दिले होते. यामुळे या सर्व कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली होती. या पूर्वानुभवामुळे दुसऱ्या लाटेत शासकीय कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांनी काम करण्यास उत्सुकता दाखवली नाही.
स्थानिक प्रशासनाने आगामी गणेशोत्सव कालावधीत कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना विविध अटींचे पालन करून प्रवेश देण्याचे निश्चित केले आहे. एका बाजूला राज्य व केंद्र सरकार नागरिकांना भविष्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. परंतु, असे असताना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच जिल्ह्यात शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य किंवा अयोग्य हे येणार काळ ठरवणार आहे.