देवरुख/ आरवली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवलीनजीकच्या कलटा मारुती येथे एस. टी. बस व मारुती झेन एस्टिमो यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात पाचजण जखमी झाले असून, यातील एका महिलेची प्रकृ ती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, मारुती झेनचा चक्काचूर झाला आहे. अपघातादरम्यान झेनमधील प्रवासी आतमध्ये अडकले गेल्याने गॅसकटरच्या सहायाने जखमींना बाहेर काढावे लागले. चिपळूण डेपोची ८.४५ ला सुटणारी चिपळूण - रत्नागिरी चालक अशोक हलप्पा शेखसंधी (३६) हे घेऊन रत्नागिरीला निघाले होते. यावेळी रत्नागिरीहून (मुुंबई) डोंबिवलीला निघालेली मारुती झेन आरवली येथे आली असता ती बसवर समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. अपघातात मारुती झेनमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये शुभदा गोविंद दीक्षित ही महिला अत्यवस्थ असून, अन्य चारजण जखमी आहेत. जखमींमध्ये चालक महेश मधुकर कदम (३२, मुंबई), सुहास व्यंकटेश करकरे (७०, डोंबिवली), गिरीश अविनाश रायकर (२५, मुंबई), गोविंद रामचंद्र दीक्षित (७२, मुंबई - नालासोपारा) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातादरम्यान मारुती झेनचा चुराडा झाल्याने प्रवासी आतमध्ये अडकले होते. गॅसकटरच्या मदतीने या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले. अधिक तपास हे. कॉ. डी. एस. पवार, पो. ना. एस. एस. भुजबळराव, कॉन्स्टेबल सी. व्ही. माने करीत आहेत. (प्रतिनिधी)
आरवलीत बस-कार अपघात
By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST