दापाेली : कृषी जिल्हानिहाय कृषी पदवीधर मंचाची स्थापना करण्यात येणार असून, विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. ‘मेरा गाव, मेरा गाैरव’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वत:च्या किंवा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी परिसरातील एक गाव तंत्रज्ञान प्रसारासाठी दत्तक देण्यात येणार आहे़. ही गाेष्ट ऐच्छिक असून, जास्तीत जास्त शास्त्रज्ञांना समाविष्ट करण्याचा मानस आहे. काेकण कृषी विद्यापीठ शेतकरीभिमुख तंत्रज्ञान प्रसार उपक्रम राबवणार असल्याची माहिती कुलगुरू डाॅ़. संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी माहिती दिली़. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी विविध विस्तार शिक्षण उपक्रमांचा आढावा घेतला. शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक घडामोडींवर प्रकाश टाकला. संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी संशोधनासंदर्भातील मुद्दयांवर चर्चा केली.
विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आणि संशोधन केंद्रामार्फत कार्यान्वयीत असलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे बळकटीकरण आणि तालुकानिहाय आणि पीकनिहाय शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना, शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन आणि कृषी विस्तार करण्यासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. कोविडसारख्या वैश्विक महामारीमध्ये मुंबईस्थित चाकरमानी गावाला परत आलेले आहेत. त्यांची शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये पुनर्स्थापना करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याची सुरुवात दापोली तालुक्यातील कुडावळे या गावापासून झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर करण्यासाठी विविध विषयांचे मोबाईल ॲप तयार केले जाणार आहेत.
या सभेसाठी संचालक, विस्तार शिक्षण डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. संतोष वरवडेकर यांनी मानले. या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे डॉ. बी. एन. सावंत, मत्स्य महाविद्यालय, शिरगांवचे डॉ. प्रकाश शिनगारे, डॉ. केतन चौधरी, प्रादेशिक भात संशोधन केंद्राचे डॉ. एस. बी. भगत, डॉ. रवींद्र मर्दाने, डॉ. एस. डी. देसाई, डॉ. एम. एच. खानविलकर, डॉ. संतोष वरवडेकर, डॉ. मनीष कस्तुरे, प्रकाश पवार, अतुल पाटील, किसन माळचे, विष्णू जाधव यांनी योगदान दिले.