लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मोठी लोकवस्ती असलेल्या रामपूर ते गुढे रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याची पुरती चाळण झाल्याने वाहनधारकांना या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने आरपीआय - ए पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष मोहिते आक्रमक झाले आहेत. या रस्त्याची तत्काळ डागडुजी न झाल्यास पक्षातर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत सुभाष मोहिते यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रामपूर ते गुढे रस्ता हा उमरोली, पाथर्डी, शिरवली, मिरवणे, ताम्हणमळा, गुढे, डुगवे या गावांतील नागरिकांसाठी दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. ताम्हणमळा येथे जांभा चिरेखाण असल्यामुळे जड वाहनांची बारमाही वाहतूक सुरू असते. स्वामित्व धन यांच्या रूपाने शासनाला महसूल प्राप्त होतो. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तसेच पाथर्डी येथील पूलही धोकादायक स्थितीमध्ये आहे.
संबंधित खात्याकडून पुलाशेजारी धोकादायक पूल म्हणून फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याशी रामपूर ते गुढे रस्त्याची दुरवस्था व धोकादायक पूल याबाबत चर्चा झाली आहे. ते दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागण्याही शक्यता असून, सध्या जनतेला मोठ्या त्रासाला सहन करावे लागत आहे. यापुढे या रस्त्याकडे दुर्लक्ष करून वेळकाढूपणा केल्यास आरपीआयच्या (ए) च्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असेही मोहिते यांनी म्हटले आहे.