अनिल कासारे -लांजा --दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला... सुखी संसाराच्या जीवन वेलीवर एक फुल उमलणार... याची चाहुल उभयतांना लागताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता... राजेश आणि रिया... आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्याबाबत स्वप्नातील इमले रचत होते... बघता बघता सात महिने निघून गेले. गणपती आगमनाच्या दुसऱ्या दिवशी चहा बनवण्यासाठी स्टोव्ह पेटवत असतानाच त्याचा भडका उडाला... त्यामध्ये रिया ४० टक्के भाजली... आगीत होरपळलेल्या अवस्थेत आपल्या पोटी असलेल्या बाळाला पाच दिवसांनी जन्म दिला... मात्र, त्या क्रूर काळाने चार दिवसांनंतर रियावर झडप घातली आणि चार दिवसांच्या नवजात बालकाला पोरके केले.गवाणे - करंबेळेवाडी येथे राहणारा राजेश कांबळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होता. घरी आई - वडील, भाऊ - भावजय असे छोटेसे कुटुुंब. राजेश यांचे कुवे येथील मुलीशी प्रेम होते. दोघांनीही प्रेमाचे रुपांतर लग्नात करुन आयुष्याच्या गाठी घट्ट बांधल्या. मात्र, मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असल्याने रियाच्या माहेरची माणसे येत नव्हती. एक वर्ष पूर्ण झाल्यावर रिया राजेश कांबळे (२८) हिच्या आयुष्यात संसाराच्या वेलीवर एक फूल उमलणार असल्याची चाहुल तिला लागली. बघता बघता सात महिने उलटून गेले. गणपतीचा सण असल्याने साऱ्यांचीच धावपळ होती. कांबळे कुटुंबीय तर खूप खूश होते. दि. १७ सप्टेंबर रोजी कांबळे कुटुंबियांनी मोठ्या दणक्यात बाप्पा आपल्या घरी आणले. गणपती असल्याने राजेश घरीच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण आपापल्या कामात दंग होते. रियादेखील आपली कामे झटपट आवरून घेत होती. गणेशोत्सवात रात्री जागरण असल्याने दुपारी जेवण आटोपून राजेश घरामध्ये झोपला होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चहा करण्यासाठी रिया स्वयंपाकघरामध्ये गेली. यावेळी स्टोव्हचा अचानक भडका उडाला. यामध्ये तिचा चेहरा व पाठ आगीच्या भाजली होती. तिने आरडाओरड केली. झोपलेला राजेश जागा झाला. त्याने स्वयंपाकघरात धाव घेतली आणि आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या रियावर पाणी ओतले व आग विझविली. राजेशने रियाला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृ ती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयातून रियाला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येतीमध्ये सुधारणा दिसू लागल्याने दि. २२ रोजी रियाला आपल्या घरी गवाणे येथे आणण्यात आले.दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २३ सप्टेंबर रोजी पहाटे रियाला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. भाजलेल्या अवस्थेत तिने ४ वाजण्याच्या दरम्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, सातव्या महिन्यामध्ये प्रसुती झाल्याने बाळ नाजूक होते. राजेशने तत्काळ बाळास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भाजलेल्या अवस्थेत असणाऱ्या रियाची प्रसुती झाल्याने तिची तब्येत खालावली होती.मात्र, मोठा धीर करत तिने आलेल्या परिस्थितीचा सामना केला. मात्र, चारच दिवसांमध्ये रियाची तब्बेत पुन्हा खालावली. तिचा चिमुकला मुलगा उपचारासाठी रत्नागिरीत असल्याने तिला पाहताही येत नव्हता. अखेर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रियाची प्राणज्योत मालवली. या घटनेने साऱ्या गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.1रिया भाजल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती प्रसूतही झाली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली.2मयत रिया हिला मुलगा झाला. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. याचदरम्यान तिच्या चिमुकला हा तब्बेतीने नाजूक असल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे तिला आपल्या मुलाचा चेहराही पाहता आला नाही.3रियाच्या या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एका मुलाला पोरकी करून रियाने या जगाचा निरोप घेतला.
चिमुकल्यास जन्म दिल्यानंतर तिला ‘मृत्यू’ने कवटाळले...!
By admin | Updated: September 28, 2015 23:35 IST