रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल आणि कला व सांस्कृतिक संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पं. जिंतेंद्र अभिषेकी स्मृती संगीत संमेलनास सावरकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. गोव्यातील कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर नाट्यसंगीतातील पदे सादर करून रसिकांची दाद घेतली.पं. दिनकरबुवा पणशीकर, तुळशीदास नावेलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी अशोक परब, भास्कर शेट्ये, डॉ. मेधा गोंधळेकर उपस्थित होते. कलाक्षेत्रातील देवाणघेवाण व आदानप्रदान तसेच भावी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गोव्याबाहेर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गोवा सरकारचे प्रोत्साहन लाभत असल्याचे पं.दिनकरबुवा पणशीकर यांनी सांगितले. ‘पंच कुंडल नर कुंड म्हालदार’ या पदाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. नाट्यसंगीत परंपरेस अध्यात्मापासून सुरूवात झाली. अण्णा किर्लोस्कर यांनी किर्तनातून संगीत भूमीस मौलीक देणगी दिली. सं. गोरा कुंभार मधील ‘निर्गुणाचा संग.. धरीला जो आवडी...’ हे पद मुग्धा गावकर यांनी सादर केले. चंद्राचं शीतल चांदणं बालगंधर्वाच्या स्वरातून रसिकांनी एकीकडे अनुभवत असतानाच दुसरीकडे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्यामुळे दिव्य, तेजस्वी गायनाची प्रचिती आली. त्याचवेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या दारी ‘स्वरांचा पिंपळ’ असल्याचा अनुभव रसिकांनी अनुभवला. मंगेशकर यांची सं. ब्रम्हकुमारी नाटकांतली स्वर व शब्दाचं सौंदर्य याची प्रचिती देणारे ‘विलोपले मधुमिलनात या’ हे पद सुनिल दिउलकर यांनी सादर केले. काळाच्या ओघात मराठी नाट्य संगीत बहरत असतानाच विद्याधर गोखले, वसंत कानिटकर, शिरवाडकर यांच्या माध्यमातून नाट्यसंगीतास गंगातीर लाभला. सं. मत्स्यगंधा नाटकातील ‘देवा घरचे ज्ञात कुणाला..’ हे पद प्राची जठार यांनी सादर केले. परंपरेच्या बाहेर राहून रसवंत संगीत पं.जितेंद्र अभिषेकी यांनी दिले. पं.अभिषेकी यांचे ‘संगीत रस सुरस मम जीवनाचा..’ पद चंद्रकांत वेर्णेकर यांनी सादर केले. सं.स्वयंवर नाटकातील ‘नरवर कृष्णा समान..’ पद मुग्धा गांवकर हिने सादर केले. सूत्रसंचलन गोविंद भगत हिने सादर केले. (प्रतिनिधी)
अभिषेकी स्मृती संगीत संमेलनास प्रारंभ
By admin | Updated: September 28, 2014 00:20 IST