मेहरून नाकाडे
रत्नागिरी : हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. पंचांगानुसार चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेचे वसंती ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाते. स्वागताला दारासमोर गुढी उभारली जाते. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा सण साजरा करताना बांबूला वस्त्र लावून गढू ठेवून गुढी उभारण्यात आली आहे. मात्र नाचणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर यांनी चक्क पुस्तकाची गुढी उभारली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचे औचित्य साधून पुस्तकांची गुढी उभारून दीपक नागवेकर यांनी विधिवत पूजा केली. या पुस्तकांच्या गुढीसाठी भगवत गीता, संविधान, आत्मचरित्रे, बालकथा संग्रह, विविध लेखकांची पुस्तके एकावर एक मांडून आकर्षक गुढी उभारण्यात आली होती. नागवेकर यांनी या गुढीची पूजा केली. या आगळ्यावेगळ्या गुढीबद्दल सर्वत्र चर्चा असून नागवेकर यांच्या उपक्रमाचे काैतुक केले जात आहे.