रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर लाखोच्या संख्येने गावी आले आहेत. या काळात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती होती. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात रुग्णसंख्या मर्यादित आहे. जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ६८ रुग्ण सापडले आहेत. एका कोरोनाचा बळी गेला असून, ७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी जिल्ह्यात ५१ कोरोना रुग्ण सापडले होते, त्या तुलनेत रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या ४२९ चाचण्यांमध्ये २८ तर अँटिजनच्या २,६२५ चाचण्यांमध्ये ४० रुग्ण सापडले आहेत. दापोली तालुक्यात ७, खेड २, गुहागर ५, चिपळूण २२, संगमेश्वर ४, रत्नागिरी १६, लांजा ५, तर राजापूर तालुक्यात सात रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७७,०६१ झाली आहे.
जिल्ह्यात १,२७९ रुग्ण उपचार घेत आहेत. दापोली तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २,३७४ कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. ५० व ५० पेक्षा जास्त वयोगटांतील मृत्यूची संख्या १,९९४, तर ८३७ कोरोनाबाधितांचा सहव्याधींमुळे मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ टक्के आहे.