रत्नागिरी : कोकणातील घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यंदा कोकण रेल्वे मार्गावर ६० विशेष रेल्वे गाड्या सोडणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. या गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव व सावंतवाडी या मार्गावर धावणार आहेत. १० सप्टेंबरपासून या विशेष गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. यंदा १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. या उत्सवाला मुंबईत राहणारा अवघा कोकण पुन्हा कोकणात दिसणार आहे. या गणेशभक्तांच्या प्रवासाची सोय करण्यासाठीच या ६० विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई-सीएसटी मडगाव ही रेल्वे ११ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या काळात गुरुवार वगळून अन्य सहा दिवस मुंबईतून मध्यरात्री १२.२० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. दुपारी २.४० वाजता ही गाडी पुन्हा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीच्या दोन्हीकडच्या मिळून ३४ फेऱ्या गणेशोत्सव काळात होतील. मुंबई शिवाजी टर्मिनस-मडगाव ही गाडी १० सप्टेंबर ते १ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुंबईहून दर गुरुवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल व त्याचदिवशी दुपारी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी मडगाव येथून ३.२५ वाजता सुटेल व मुंबईला दुुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल. दादर-सावंतवाडी ही गाडी ११ सप्टेंबरपासून आठवड्यातील रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी दादरहून सकाळी ७.५० वाजता निघेल. ही गाडी पुन्हा सावंतवाडीतून दर सोमवार, बुधवार, शनिवार या दिवशी पहाटे ४.५० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी ३.५५ वाजता दादरला पोहोचेल. या सर्व गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत. (प्रतिनिधी)
कोकणात धावणार ६० विशेष गाड्या
By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST