रत्नागिरी - जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, १८ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी ११:३० वाजेपर्यंत ७४,२१० मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३४.४५ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी ६७ सरपंचांची पदे आणि ११०० सदस्यांची पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता उर्वरित १५५ सरपंचांच्या जागांसाठी तसेच ६६६ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी सध्या ४०६ उमेदवार निवडणूक लढवीत असून सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १५५ सरपंच आणि ६६६ सदस्य निवडून देण्यासाठी जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ४५ मतदार जिल्ह्यातील ५०७ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.
जिल्ह्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३४.४५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मंडणगडात ३३.८९ टक्के, दापोली ३८.५१, खेड ३५.०६, चिपळूण ३४.५३, गुहागर ३२.८५, संगमेश्वर ३०.८८, रत्नागिरी ३५.७६, लांजा ३९.२० आणि राजापूर तालुक्यात ३०.९२ टक्के इतके मतदान झाले आहे.