अडरे : तौक्ते चक्रीवादळाचा चिपळूण तालुक्यातील २७ शाळांना फटका बसला आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी २४ लाख ८८ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव अंदाजपत्रकानुसार तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून उपलब्ध झाली आहे.
चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची माेठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शाळांची छप्पर, कौले उडून गेली आहेत तसेच शाळांच्या स्वच्छतागृहाची कौले उडून, रिपा तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने जीवितहानी टळली. तालुक्यातील २७ केंद्रांतील २७ शाळांना या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामध्ये तालुक्यातील दहिवली बुद्रुक ओझरवाडी नं१, ताम्हणळा नं१, माळवाडी, शिरळ नं१, शिरळ उर्दू, गुढे डुगवे, मुंढे पायरवाडी, खोतवाडी, चिवली उर्दू नं१, कापसाच्या नं१, कोकरे नं३, खेर्डी शिगवण, वहाळ नं१, कोसबी घाणेकर, कळवणे रिंगी, कालवड रामवाडी, अकले गुरव, बौद्धवाडी, तिवरे न १, वीर नं २, तिवडी गावठाण, मोरवणे, वीर नं५, निवळी कोदारे, सावर्डे कासार, कोळकेवाडी धनगरवाडी, आबीटगाव या शाळांचा समावेश आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे शाळेतील संगणक व इतर साहित्य हलविण्यात आले होते. सुदैवाने त्यांची हानी टळली.