रत्नागिरी : स्वच्छता विभागात काम करणाऱ्या मेहतर समाजातील कर्मचाऱ्यांना शासनाच्या श्रमसाफल्य योजनेतून शहरातील गवळीवाडा येथे २४ फ्लॅट बांधून दिले जाणार आहेत. १ कोटी ३१ लाखांचा हा प्रकल्प असून, त्यातील शासनाचा ८० लाख निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. मात्र, या प्रकल्पाची कागदपत्र जिल्हा प्रशासनाच्या लाल फीतीत अडकली असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी या कामगारांकडून होत आहे.रत्नागिरी पालिकेच्या सफाई विभागात मेहतर समाजातील ज्या कामगारांची २५ वर्षे सेवा झाली आहे, त्यांना हे वन बीएचके फ्लॅट दिले जाणार आहेत. शासनाच्या श्रमसाफल्य योजनेतून या कामगारांना घरे मिळावीत म्हणून नगरसेविका प्रीती सुर्वे गेल्या वर्षभरापासून या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत आहेत. गवळीवाडा येथील पालिकेच्या जागेत या कामगारांसाठी अपार्टमेंट उभारली जाणार आहे. सध्या याच जागेत चाळपध्दतीच्या जुन्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून हे कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह राहात आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून या कामगारांची चांगल्या घरांची मागणी होती. पालिकेने त्यासाठी शासनाच्या श्रमसाफल्य योजनेतून या कामगारांना पक्की घरे देण्याचा प्रस्ताव शासनाला दिला. त्याला मंजुरीही मिळाली. त्यानुसार राज्य शासनाकडून या घरांसाठी ८० लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. याबाबतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही त्रुटींची पुर्तता करण्यास पालिकेला सांगण्यात आले होेते. त्यानुसार ३ जुलै २०१४ रोजी पालिकेकडून त्रुटींची पुर्तता करून पत्र देण्यात आले आहे. मात्र, त्याला आता महिना होत आला तरी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे श्रमसाफल्य योजनेचा हा प्रस्ताव अद्याप लाल फीतीत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
श्रमसाफल्य योजनेतील २४ फ्लॅट लालफितीत
By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST