शिरगाव : देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव पावणादेवी मंदिराजवळ खासगी ट्रॅव्हल्सने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात एस.टी. बसमधील २0 प्रवाशी जखमी झाले. जखमींमध्ये बहुतांशी शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७.२0 वाजता घडली. देवगड आगाराची देवगड-कुंभवडे ही एस.टी बस सुमारे ७५ प्रवाशांसह शिरगावच्या दिशेने येत असताना पावणाई मंदिराजवळ मुंबईहून देवगडच्या दिशेने येणाऱ्या दिक्षिता ट्रॅव्हल्सच्या चालकाने एस.टी. ला हुलकावणी दिल्याने चालकाने बसमधील प्रवाशी वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजुला घेताना ती १0 फूट खाली उतरली. तसेच ती समोरच्या सागाला झाडाला आपटली. या अपघातात एस.टी च्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर २0 प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी १0 जण गंभीर जखमी आहेत. यामध्ये चालक-वाहक यांचाही समावेश आहे. तळेबाजार, किंजवडे, तळवडे, वरेरी, वळीवंडे, लिंगडाळ तिठा येथून येणारे बहुतांशी विद्यार्थी या बसने शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात. परंतु कुंभवडे बसच्या अगोदर देवगड-कणकवली बस पुढे आल्याने कुंभवडे बसमध्ये नेहमीपेक्षा कमी विद्यार्थी होते. रस्त्याच्या बाजुला ज्याठिकाणी एस.टी. अपघातग्रस्त झाले तेथे सागाचे झाड असल्याने बसचा वेग झाडावर आदळल्याने कमी झाला. अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागणार होते. वृत्त कळताच रिक्षा चालक-मालक संघटनेचे व राजे ग्रुप या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. लक्ष्मण गोडसे, माजी प्राचार्य विजयकुमार कदम, प्रा. सुभाष खरात, प्रा. पाताडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. विद्यार्थ्यांची विचारपूस करत पालकांना कल्पना दिली. वैद्यकीय अधिकारी वाय. एस. चव्हाण व सर्व कर्मचाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार केले. यावेळी दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धाव घेतल्याने गर्दी झाली होती. देवगडचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे, पराग मोहिते, विक्रम काकडे, गुरूप्रसाद परब, एम. ए. जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून जखमींची चौकशी केली. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी कणकवलीत हलविण्यात आले. तर अंकिता राणे, सोनल घाडी, प्रसाद घाडी या विद्यार्थ्यांना गंभीर दु:खापत झाल्याने कणकवलीतून ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. सरपंच अमित साटम, संभाजी साटम, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेट्ये, संतोषकुमार फाटक, मिलिंद साटम, संदीप साटम, पंचायत समिती सदस्य रवींद्र जोगल, संतोष किंजवडे, मंगेश लोके, शरद साटम, हरी चव्हाण, संतोष जंगले, संदीप चव्हाण, जयदेव कदम, विठ्ठल सावंत यांनी मदत केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)अपघातातील जखमीअपघातात सोनल अंकुश घाडी (वय १६), अजित विजय घाडी (वय १७), मनोहर नामदेव घाडी (वय १७ तिघेही रा. वळीवंडे), प्रसाद विलास घाडी (वय १७, किंजवडे), अक्षय विजय लाड (वय १७, तळवडे), विलास सोनू लाड (वय ३६, वाघेरी, फोंडा), सुरत सुनिल घाडी (वय १४, लिंगडाळ तिठा), मनिषा दुर्योधन पवार (वय ४९, ओंबळ), अलका किसन मुंडे (वय २0 वाहक, देवगड) हे गंभीर जखमी झाले. अन्य जखमींमध्ये गणपत शांताराम भुजबळ (वय ५0, जामसंडे), अंकिता राजेंद्र राणे (वय १७, वरेरी), करण श्रीमंत चव्हाण (वय १७, वळीवंडे), बाळकृष्ण पिलाजी तावडे (वय १७ वळीवंडे), विभा सोनू लाड (वय ३१ वाघेरी-फोंडा), पूजा पंढरीनाथ सावंत (वय १८, तळेबाजार), प्रसाद विलास घाडी (वय १७, किंजवडे), निकिता प्रकाश पडेलकर (वय १६, वरेरी), विलास महादेव इंदूलकर (वय ४८, चालक, घोणसरी), संचिता पद्माकर धर्णे (वय १६), स्नेहा उल्हास धर्णे (वय १६, दोन्ही वरेरी) यांचा समावेश आहे.
एस.टी.अपघातात २0 प्रवाशी जखमी
By admin | Updated: August 5, 2014 00:03 IST