मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली येथील कोविड रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत खा. सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त करून ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या होत्या. त्याचा पाठपुरावा केल्याने या रुग्णालयास नवीन २० ऑक्सिजन कनेक्शन उपलब्ध झाले आहेत. रुग्णालयास मंजूर असलेल्या तीस बेड्सपैकी केवळ दहा बेड्सना ऑक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध होती़ आता मात्र रुग्णालयातील सर्वच्या सर्व तीस बेड्सना ऑक्सिजनचे कनेक्शन जोडण्यात आले आहेत़
मंडणगड येथे एक महिन्यापूर्वी सोयी-सुविधांचा अभाव असतानाही गरजेचे असल्याने कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले़ खासदारांच्या आढावा बैठकीनंतर माजी आ. संजय कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्व बेड्सना ऑक्सिजनचा पुरवठा हाेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर नवीन २० बेड्स उपलब्ध झाले असून, ते कार्यान्वितही करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागाची मंडणगड शहरातील विनावापर इमारत उपयोगात आणण्यासाठी तिची पाहणी करून तिचे दुरुस्ती व नव्याने वापराचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम यांच्यातर्फे काेविड रुग्णालयांतील रुग्णांना सकस आहार मोफत पुरवण्यात आला आहे.
माजी आ. संजय कदम यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन येथील विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन बेड्सची पाहणी केली़ तसेच रुग्णांची चौकशी करत त्यांच्याशी संवाद साधला़ यावेळी तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, प्रकाश शिगवण, वैभव कोकाटे, नितीन म्हामुणकर, दीपक घोसाळकर, हरेश मर्चंडे, सर्फराज चिपोलकर, मोबीन परकार, इम्रान महाडिक, व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
मंडणगड तालुक्यातील भिंगळाेली येथील काेविड रुग्णालयाच्या भेटीदरम्यान माजी आ. संजय कदम यांनी माहिती घेतली़ यावेळी डॉ. आशिष शिरसे, मुझ्झफर मुकादम उपस्थित हाेते़