खेड : तालुक्यातील शिर्शी गावातील खालचा मोहल्ला येथे दोन गटात झालेल्या मारहाणीप्रकरणी परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील चौदाजणांना पोलिसांनी अटक केली आहे़ शिर्शी येथे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. शिर्शी गावातच एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त जात असलेल्या कारचालक रियाझ इकबाल हमदुले यांना गाडीसह अडवून त्यांना काठीने मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्यावर ब्लेडनेही वार करण्यात आले आहेत. यामुळे ते जबर जखमी झाले आहेत. आपल्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून, आपल्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी फिर्याद रियाझ यांनी खेड पोलीस स्थानकात नोंदवली आहे़ याप्रकरणी पोलिसांनी मोझम कादीर हमदुले, इशान बशीर हमदुले, पईन खैरान हमदुले, रियाना दाउद हमदुले, मुझबीन सलाउद्दीन वालपकर, रियाझ महंमद हुसैन हमदुले आणि बशीर महंमद हुसैन हमदुले (सर्व शिर्शी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. याप्रकणी परस्परविरोधी फिर्याद दाखल असून बशीर महंमद हुसैन हमदुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रियाझ इकबाल हमदुले, शब्बीर अली हमदुले, असलम इस्माईल हमदुले, इकबाल इशमुद्दीन हमदुले, आसिफ इस्माईल हमदुले, जिनेत अस्लम हमदुले आणि सलाउद्दीन दानियत हमदुले या सातजणांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रियाझसह सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोन्ही गटातील एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे. पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी)
शिर्शीतील हाणामारीत १४ ग्रामस्थांना अटक
By admin | Updated: May 25, 2014 01:18 IST