मंडणगड : मंडणगड शहरात अत्यावश्यक सेवेतील १२ जण कोरोनाबाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.
दि. २१ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या तपासणीत शहरात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ६ दुकानांमधील १२ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व बाधित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा देणारे व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. शहरात सुमारे ५० व्यापारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यापैकी बहुतांश व्यापाऱ्यांनी कोराेना तपासणी केली आहे. मंडणगड नगरपंचायत व आरोग्य यंत्रणेने ही व्यवस्था केली आहे. दि. १६ रोजी करण्यात आलेल्या २२६ तपासण्यांपैकी केवळ ६ जण बाधित आले आहेत. यानंतर दि. २१ रोजी पुन्हा तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यानंतर नगर पंचायत प्रशासनाने शहरात सॅनिटायझेशन केले असून, लगतच्या व्यापाऱ्यांना यासंदर्भात माहिती देऊन दुकाने बंद केली.