रत्नागिरी : ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरी नगरपालिका क्षेत्रातील कार्यादेश (वर्कआॅर्डर) देण्यात आलेली सुमारे चार कोटी खर्चाची शंभर विकास कामे सुरूही झालेली नाहीत. त्याबाबत त्या ठेकेदारांना केवळ नोटिसा देऊन, अनामत जप्त करून भागणार नाही. अशा बेजबाबदार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे व त्या कामांच्या फेरनिविदा काढाव्यात, अशी मागणी उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी केली. याबाबत सविस्तर कार्यालयीन अहवाल पुढील सभेत मांडून योग्य निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या पालिकेच्या सभेत विषयपत्रिकेवरील ३० विषयांबाबत चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. त्यावेळी नगरोत्थान जिल्हास्तर अंतर्गत एकूण ९ कामांना कार्यादेश देऊनही ठेकेदारांनी ही कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण केली नाहीत. तसेच पालिकेच्या गटार बांधकाम, बोळांमध्ये चेकर्ड टाईल्स बसविणे, रस्ते डांबरीकरण, स्ट्रीटलाईट बसविणे अशा ९१ कामांचे कार्यादेश देऊनही कामे झाली नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून ही कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना नोटिसा देऊनही कार्यवाही न झाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचा मुद्दा पुढे आला. मात्र, त्यापेक्षा अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण सभापती दीपा आगाशे यांच्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजनास व त्यासाठी होणार्या खर्चास सभेत मंजुरी देण्यात आली. साळवी स्टॉप येथे साठलेल्या घनकचर्यावर माती टाकून सपाटीकरण करणे व अंतर्गत रस्ते तयार करणे, कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी अंदाजपत्रकाप्रमाणे मंजुरी देणे, जिल्हा नियोजनमधून निधी प्राप्त होण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या दवाखान्यात मिश्रक म्हणून डी. फार्म उमेदवारच आवश्यक असल्याने अन्य उमेदवारास घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
१00 कामे थांबवणारे ठेकेदार काळ्या यादीत?
By admin | Updated: May 14, 2014 00:30 IST