नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते शेलू-वांगणीदरम्यान अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा व धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने या गतिरोधकांमुळे दोन महिन्यांत या महामार्गावर अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे यापुढे या रस्त्यावर आपले मित्र, नातेवाईक अथवा कोणत्याही प्रवाशांना अपघात होऊ नये यासाठी नेरळ व परिसरातील तरु णांनी एकत्र येऊन नेरळ ते शेलूदरम्यान स्वखर्चाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढण्याचे काम केल्याने या तरु णांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कर्जत-कल्याण राज्य मार्गाचे चौपदरीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. एमएमआरडीएने या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारले होते, परंतु रस्त्याकडेच्या स्थानिकांनी आपल्या मर्जीने बेकायदा गतिरोधक उभारले आहे. या गतिरोधकांमुळे अनेकांना अपघात होऊन मोठ्या प्रमाणात अनेकांना त्रास सहन करवा लागला आहे. मात्र एमएमआरडीएचे अधिकारी या बेकायदा गतिरोधक टाकणाऱ्यांवर करवाई करीत नाहीत. त्यामुळे असा त्रास पुन्हा कोणालाही होऊ नये म्हणून यावर काय उपाययोजना करता येईल, यासाठी नेरळ येथील तरु ण एकत्र आले व त्यांनी हे अपघात कसे टाळता येथील याच्यावर विचारविनिमय सुरू केला. त्यांनी या मार्गावरील जेवढ्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत व जे अतिधोकादायक आहेत, त्या गतिरोधकांवर स्वखर्चाने पांढरे पट्टे ओढण्याचे काम केले आहे; जेणेकरून या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल. नेरळमधील तरु णांनी केलेले हे काम कौतुकास्पद असून, यामुळे अपघाताचे कमी होईल यात शंकाच नाही. नेरळमधील प्रवीण कोळंबे व त्यांचे सहकारी मित्र रोहित कराळे, हितेश मराठे, निदान कराळे, संकेत कराळे, बंटी कराळे, रोहित कराळे यांनी एकत्र येऊन हे काम केले. कर्जत-कल्याण राज्य मार्गावर अनेक ठिकाणी गरज नसतानाही बेकायदा गतिरोधक उभारले आहेत व त्यावर पांढरे पट्टेही ओढले नसल्याने गतिरोधकांचा अंदाज येत नाही. यामुळे अनेकांना या मार्गावर अपघात झाला आहे. असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही एकत्र येऊन हे गतिरोधक रंगविण्याचे काम केले आहे; जेणेकरून या गतिरोधकांमुळे कोणालाही अपघात होऊ नये, अशी आमची यामागची भावना आहे.- प्रवीण कोळंबे, जागृत तरु ण, नेरळ
अपघात रोखण्यासाठी तरुण सरसावले
By admin | Updated: May 28, 2016 02:35 IST