कर्जत : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या हेदवली गावाला मांडवणे भागाने जोडण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. आमदार सुरेश लाड यांनी पुढाकार घेऊन मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक कार्यकर्ते यांनी १२ मे रोजी केले होते. मात्र आजपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने स्थानिकांची गैरसोय कायम आहे.कर्जत-मुरबाड राज्यमार्गाने सावळा फाटा येथून हेदवली गावाला जाण्यासाठी रस्ता आहे. वारकरी सांप्रदायाबरोबर जोडल्या गेलेल्या या गावाकडे सावळा गावातून येणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तेथून मांडवणे गाव १२०० मीटर अंतरावर असून मांडवणे भागाकडून कर्जतला येण्यासाठी तेथील रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार लाड यांच्याकडे केली होती.त्यातील ६०० मीटर लांबीचा मांडवणे गावाकडून हेदवली असा रस्ता यापूर्वी डांबरी तयार करण्यात आला आहे. उर्वरित ६०० मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीची तरतूद आमदार लाड यांनी करून घेतली. त्यांच्या सूचनेनुसार पावसाळ्याआधी किमान खडीकरण करून हेदवलीच्या स्थानिक रहिवासी यांना रस्ता तयार व्हावा अशा सूचना कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या होत्या. १२ मे रोजी स्थानिक ग्रामस्थ प्रताप दाभाडे, मोहन धुळे, दगडू जोशी, सोनू महाराज बदे, तुकाराम जोशी, नामदेव गायकवाड, अनंता भोर्डे, विष्णू जोशी, जनार्दन माळी आदींच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला होता. हेदवली ग्रामस्थ यांना पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत रस्त्यावर खडीकरण करण्यासाठी एक दगड देखील ठेकेदाराने टाकला नाही. त्यामुळे या पावसाळ्यात देखील हेदवली ग्रामस्थांना लाल मातीच्या रस्त्याने आणि प्रचंड खड्डे असलेल्या रस्त्याने जावे लागणार आहे.(वार्ताहर)
भूमिपूजन होऊनही काम सुरू नाही!
By admin | Updated: June 4, 2016 01:45 IST