रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे?; कंपनी-प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:30 AM2019-11-23T00:30:21+5:302019-11-23T00:30:49+5:30

सुदर्शन कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेरील सांडपाण्याचा संभ्रम कायम

Who exactly is a chemical wastewater? | रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे?; कंपनी-प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे?; कंपनी-प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

Next

- सिकंदर अनवारे 

दासगाव : महाड एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल या कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर गेल्या वर्षभरापासून पाणी साचत आहे. अनेक वेळा या पाण्याला पांढरा रंग येतो. मात्र, हे पाणी नेमके कुठून येते, याचा पत्ता आजतागायत एमआयडीसी किंवा प्रदूषण मंडळाला लागलेला नाही. कंपनी आणि शासकीय यंत्रणा एकमेकांवर बोट दाखवत असली तरी या पाण्यासंदर्भात संभ्रम निर्माण होऊन रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होते आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण विभागाकडूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक वसाहतींतील नाले व गटारात सोडण्यात येणाºया कंपन्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील काही कंपन्यांवर कारवाईही करण्यात आल्या आहेत. मात्र, आजही अनेक ठिकाणी थेट गटारांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. येथील सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर सध्या पाणी साचले आहे. या पाण्याला फेसासारखा पांढरा रंग आला आहे. सुदर्शन केमिकल कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जिप्सम साठवून ठेवण्यात आला आहे. याचठिकाणी असलेल्या सुरक्षा भिंतीजवळ हे पांढरे पाणी असल्याने प्रदूषण मंडळानेही याच कंपनीला दोषी ठरवत सांडपाणी उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, हे पाणी आपले नसल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. गेले वर्षभर याबाबत तक्रारी सुरू आहेत. ऐन उन्हाळ्यातही फेसाळयुक्त रासायनिक सांडपाणी या ठिकाणी साचून होते. याच ठिकाणाहून एमआयडीसीची एक सांडपाणीवाहिनी जाते, तिची गळती दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, हे पाणी स्वच्छ आणि पिण्याचे असल्याने त्याला पांढरा रंग येणे शक्य नसल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. यामुळे गळतीच्या पाण्यात कंपनीच्या आवारातील जिप्समचे पांढरे पाणी जमिनीत मुरून बाहेर येत असावे, असा संशय व्यक्त केला जात असला तरी कंपनी मात्र इतरांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे.

२०१८ मध्ये याबाबत महाड एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केल्याचे सुदर्शन कंपनीचे व्यवस्थापक बी. एन. कदम यांनी सांगितले. या ठिकाणी साचत असलेले पाणी आपल्या कंपनीचे नसून सांडपाणी वाहिनीला गळती असल्याचे त्यांनी नमूद केले. महाड एमआयडीसीने मात्र सांडपाणी वाहिनीला गळती नसल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी कंपनीची पाइपलाइन नसल्याचे पांढºया रंगाचे पाणी एमआयडीसीचे असण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण उपअभियंता एस. एस. गीते यांनी दिले आहे.

एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे बी. एल. वाघमारे यांनीही या ठिकाणी पाहणी करून हे पाणी आपले नसल्याचे सांगितले. यामुळे या ठिकाणी नक्की कोणाचे पाणी मुरते आहे? हा प्रश्नच निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक टी. एस. देशमुख यांनी या कंपनीविरोधात आणि कंपनीबाहेरील पाण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. जर प्रदूषण मंडळाने ठोस पावले उचलली नाही तर कारखान्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

महाड एमआयडीसीतील रासायनिक पाण्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र, हे पाणी सुदर्शन केमिकल कंपनीचे नसल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे.
- जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

Web Title: Who exactly is a chemical wastewater?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.