महाडमध्ये नाले रंगले रंगीत पाण्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 02:57 AM2018-09-10T02:57:54+5:302018-09-10T02:57:57+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाचे प्रमाण कमी होताच दरदिवशी गटारात विविध रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाचे प्रमाण कमी होताच दरदिवशी गटारात विविध रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार गेल्या आठवडाभर सुरू आहे. या प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने रसायनयुक्त पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. महाड एमआयडीसीमध्ये रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे प्रमाण अधिक आहे. यातून बाहेर पडणारे सांडपाणी हे घातक असल्याने हे पाणी सांडपाणी केंद्रात प्रक्रि या करून खाडीत सोडले जात आहे. असे असले तरी आजही नाल्यावाटे सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. गेले काही दिवसांपासून महाड एमआयडीसीमधील नाल्यात कारखान्यांतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नाल्यातून पुन्हा रंगीत पाणी वाहत असल्याचे दिसून येते.
या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दुर्लक्ष केल्याने या पाण्याचा रंग अधिक गडद होत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. शुक्र वारी आपटे आॅरगॅनिकच्या समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यातून जाणारे रंगीत पाणी थेट टेमघर नाल्यात जाऊन मिळत होते. अशाच प्रकारे रविवारी देखील औद्योगिक परिसरातील बी झोनमधून निळ्या रंगाचे पाणी दिसून आले. या प्रकाराचा शोध घेण्यात आला तेव्हा हे पाणी बिरवाडीजवळील मल्लिकार्जुनेश्वर मंदिराच्या मागील बाजूने येत असल्याचे स्पष्ट झाले.
एकीकडे महाड औद्योगिक वसाहतीमध्ये विविध उपक्र म राबवून पुरस्कार प्राप्त करणारी महाड उत्पादक संघटना काम करत असतानाच दुसरीकडे मात्र नाल्यात रासायनिक रंगीत पाणी दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सीईटीपीने
नमुने केले गोळा
रविवारी आढळून
आलेल्या रंगीत पाण्याबाबत सीईटीपीने देखील नमुने गोळा केले आहेत. मात्र पाणी सोडण्याचे प्रकार हे रात्रीच्या वेळेस होत असल्याने दुपारपर्यंत रासायनिक पाण्याचे अंश तळाशी जाऊन वरील भागात असणारे पाण्याचे नमुने तपासणीत काहीच आढळून येत नाही.
आमच्यापर्यंत ही माहिती आल्यानंतर आम्ही नमुने गोळा केले आहेत. पाणी कोणी सोडले, ते कुठून येत आहे याचा शोध घेतला जात आहे
- निखील भोसले, सी.ई.टी.पी. महाड