लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : एकदरा येथे बुधवारी पाण्याचा टँकर एका घरात घुसल्याने लक्ष्मी हरिकांत मका यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. चढणीवर असणाऱ्या टँकरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने हा टँकर मागे येऊन बाजूच्या घरावर आदळला, त्यामुळे या घराचे प्रचंड नुकसान झाले आहेत.सध्या एकदरा गावाला पाण्याची तीव्र टंचाई असून पाण्यासाठी खूप लांबवर पायपीट करावी लागते. अशातच काही ग्रामस्थ स्वत: पैसे खर्च करून पिण्याचे पाणी टँकरद्वारे मागवत असतात. हा टँकर नेहमीप्रमाणे गावातील लोकांना पाणी देण्यासाठी आला असता टँकर चढावावर असताना या टँकरचे ब्रेक फेल होऊन चढवावरून तो टँकर पाठीमागे आला व बाजूच्या घरावर आदळला, यामुळे या घरमालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घराची भिंत, फ्रीज व कपाट यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीच नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारण याच दरम्यान मासेमारी करून होडी आल्याने घरातील सर्व लोक मासळी आणण्यासाठी समुद्रकिनारी गेले होते, त्यामुळे अनर्थ टळला. गावाला पाणीपुरवठा होण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एकदरा येथे पाण्याचा टँकर घुसला घरात
By admin | Updated: May 11, 2017 02:10 IST