उरण - गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता. यामुळे जेएनपीए बंदरातील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प होती.
जेएनपीए बंदरासाठी केंद्राने राज्य शासनाच्या सिडकोच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा या दोन्ही गावांचे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायदा धाब्यावर बसवून हनुमान कोळीवाडा गावाचे १७.५० हेक्टर क्षेत्रावरील जागेत पुनर्वसन करण्याची आवश्यकता होती. मात्र, फक्त हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले. त्यातच कोळीवाडा गावालाच वाळवीने घेरले आहे. यामुळे गावातील बहुतांश घरे कोसळली आहेत.
आश्वासनानंतर १५ तासांनी आंदोलन मागेयामुळे पुनर्वसनाच्या कायद्याच्या चौकटीत योग्य जागेत पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८ वर्षांपासून ग्रामस्थांचा केंद्र, राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलन १५ तासांनी मागे घेण्यात आले आहे. बैठकीत जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.