लोकमत न्यूज नेटवर्क, रोहा: ठेवीदारांच्या संतापानंतर रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जमिनीचा वादग्रस्त लिलाव स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. याबाबतचे पत्र सहकार विभागाच्या अवर सचिव मंजूषा साळवी यांनी बँकेचे ‘कस्टोडियन’ला पाठवले होते. या घडमोडींच्या दोन महिन्यांनंतरही लिलावाला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे साळवी यांचे आदेशाच्या पत्राचे काय झाले, असा प्रश्न ठेवीदारांना सतावत आहे.
रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. यावर साळवी यांनी २९ जानेवारी रोजी लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश पारित केले. मात्र जिल्हा उपनिबंधक आणि बँकेच्या ‘कस्टोडियन’ने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर सहकारी संस्थाचे (नागरी बँका) उपनिबंधकांनी १४ फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात काय कारवाई केली, असा प्रश्न करत सविस्तर अहवाल मागविला आहे. याबाबत कस्टोडियन नीलेश शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
..तर आंदोलन करू !
जमीन आणि इमारतीचा लिलाव रद्द करण्यासाठी तत्काळ पावले उचला नाहीतर उद्धवसेना आंदोलन करील, असा इशारा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी दिला. सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, भाजपचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांनीही याबाबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.